चार नगरसेवकांची सहलीकडे पाठ
By admin | Published: September 8, 2014 12:36 AM2014-09-08T00:36:36+5:302014-09-08T00:59:05+5:30
चार नगरसेवकांची सहलीकडे पाठ
नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झालेल्या असताना शहरात असलेला कॉँग्रेसचा गटही आज सायंकाळच्या सुमारास स्वत:च्या वाहनांमधूनच सापुतारा येथे रवाना झाला. दुपारी एकची वेळ निश्चित केलेली असताना सदस्यांना जमविताना सायंकाळचे पाच वाजले. तब्बल चार तास प्रतीक्षा केल्यानंतरही १० सदस्यच कमिटीत जमले आणि खासगी वाहनांमधूनच त्यांनी सापुताऱ्याला कूच केले. येत्या आठवड्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू असताना कमी संख्याबळ असतानाही उद्धव निमसे यांच्या उमेदवारीतून कॉँग्रेसने चमत्कार घडविण्याची तयारी सुरू केली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळीच कॉँग्रेसचे सदस्य सहलीला जाणार असल्याचे वृत्त असताना दुपारच्या सुमारास कॉँग्रेस कमिटीमध्ये केवळ नगरसेवक शाहू खैरे हेच दिसून आले. या दरम्यान, शहराध्यक्ष शरद अहेर सर्वच सदस्यांना जमविण्याच्या कामाला लागले होते. गणेशाच्या पूजेसाठी सदस्यांना वेळ लागत असल्याचे कारण या दरम्यान देण्यात येत होते. त्यानंतर सहलीची वेळ सायंकाळी पाच वाजेची असल्याचे सांगण्यात आल्यानंतर ४ वाजेपासून कमिटीत एक एक सदस्याचे आगमन होऊ लागले. शहराध्यक्ष शरद अहेर यांची तेथे उपस्थिती होतीच. काही सदस्य आल्यानंतर मोठी गाडी येईल आणि सगळे नगरसेवक एकत्र मोठ्या गाडीत रवाना होतील, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु ज्येष्ठ नगरसेवकांसह १० नगरसेवकच येथे उपस्थित झाले. त्यात वैशाली भागवत, समीना मेमन, योगिता अहेर, लता पाटील या नगरसेवक अनुपस्थित राहिल्या, तर नगरसेवक कन्हय्या साळवे काही काळ शहरात असल्याचीच चर्चा होती; परंतु नंतर तेही या नगरसेवकांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार उद्या शहराच्या आसपासच राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, मनसेचे उमेदवार मात्र प्रथम मुंबईत जाऊन राज ठाकरेंची भेट घेतील. त्यानंतर जाहीर झालेल्या उमेदवारासह शहराकडे परततील आणि अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना होतील. (प्रतिनिधी)