कोरोनातही अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय नीतिमूल्यांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:13+5:302021-08-18T04:20:13+5:30
शासनाच्या सर्वच विभागांतील वर्ग-२ आणि वर्ग-३ श्रेणीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून शासकीय कामकाज, कायदे व ...
शासनाच्या सर्वच विभागांतील वर्ग-२ आणि वर्ग-३ श्रेणीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून शासकीय कामकाज, कायदे व नियम यासोबतच शिस्त, नीती आणि मूल्ये शिकविली जातात. काेरोनाच्या काळातही प्रशिक्षण थांबले नाही. ऑनलाइनच्या माध्यमातून मागील वर्षी ८५७, तर यावर्षी ८२९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाज, कायदे व नियम यासोबत प्रशासनातील शिस्त, नीती आणि मूल्ये याबाबत प्रशिक्षण दिले जाते. विभागीय प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे कमीत कमी एक हजार कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. कोरोनामुळे मागील वर्षी काहीसा परिणाम झाला असला तरी ऑनलाइन कार्यक्रम तयार करून अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत प्रशिक्षण पोहोचविण्यात आलेले आहे. शासकीय कामकाजात बदलत्या काळात येणारी आव्हाने पेलण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण वर्गासोबत बदलत्या काळात शासनाच्या विविध विभागांच्या कामकाज व प्रशिक्षणाबाबत नेमक्या गरजा काय आहेत? याचेही विश्लेषण करण्यात येते. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाज करताना प्रशासकीय कामाची दिशा या माध्यमातून मिळते. त्यामुळे शासनाची प्रतिमा उजळ ठेवण्यासही मदत होते.
कोरोनापूर्वी दरवर्षी साधारणतः १००० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून प्रशिक्षण दिले जात होते. मागील वर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर मात्र प्रशिक्षण संस्थेने आपल्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल करून ऑनलाइन प्रशिक्षण वर्गावर भर दिलेला आहे. सन २०२०-२०२१ मध्ये कोविडविषयक उपाययोजनांसहित इतर बाबींवर एकूण ८५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात आले. सन २०२१-२०२२ मध्ये एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत एकूण ८२९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जून आणि जुलै महिन्यात महसूल सेवेत नव्याने रुजू झालेल्या एकूण ३१७ तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
170821\17nsk_9_17082021_13.jpg
अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी तथा निबंधक,विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था