नाशकात विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी गिरवले तंत्रज्ञानासह आरोग्य आणि व्याकरणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:04 PM2018-08-11T14:04:08+5:302018-08-11T14:08:17+5:30
विज्ञानाचे महत्व अधोरेखित करणारे प्रयोग, गाण्यांच्या माध्यमातून हसत खेळत गिरवलेले व्याकरणाचे धडे, पवनचक्कीपासून तयार होणारी सौरउर्जा, ठिबक सिंचनातून आधुनिक शेतीसाठी साकारलेला कृषी प्रकल्प, हार्ट अॅटकच्या रुग्णांसाठी तात्काळ उपचार करून देणारा सीपीआर प्रयोग इस्पॅलियर शाळेतील कला, शास्त्र, विज्ञान, संगीत अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दोन दिवसीय या प्रदर्शनात तब्बल २०० हून अधिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले.
नाशिक : विज्ञानाचे महत्व अधोरेखित करणारे प्रयोग, गाण्यांच्या माध्यमातून हसत खेळत गिरवलेले व्याकरणाचे धडे, पवनचक्कीपासून तयार होणारी सौरउर्जा, ठिबक सिंचनातून आधुनिक शेतीसाठी साकारलेला कृषी प्रकल्प, हार्ट अॅटकच्या रुग्णांसाठी तात्काळ उपचार करून देणारा सीपीआर प्रयोग इस्पॅलियर शाळेतील कला, शास्त्र, विज्ञान, संगीत अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दोन दिवसीय या प्रदर्शनात तब्बल २०० हून अधिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले.
त्रिमूर्ती चौकातील येथील इस्पॅलियर शाळेत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आॅगस्ट रोजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, रतन लथ, इस्पॅलियर स्कूलचे प्रमुख सचिन जोशी, शाम लोंढे, अविनाश आव्हाड, रोहिणी दराडे, विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षण देण्याऐवजी प्रात्यक्षिकांवर आधारित प्रयोगशील शिक्षण दिले पाहिजे. पारंपारिक शिक्षणाला प्रयोगशील शिक्षणाची जोड दिल्यास खऱ्या अथार्ने चांगले विद्यार्थी घडू शकतील. भविष्यातील गरज ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या इस्पॅलियर स्कूलच्या प्रयोगशीलतेचे सर्वांनी अनुकरण करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सचिन जोशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी हे इनोव्हेटिव्ह प्रदर्शन भरविले जाते. यावर्षी मोठ्या स्वरुपात प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यात विद्यार्थ्यांना सादर केलेले प्रकल्प नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील असून त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान,इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थी कारुण्य धुमाळी, आर्य खैरनार, शिवम निमसे, नचिकेत घुले या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनुप खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली चार प्रयोगांचे सादरीकरण केले होते. त्यात मंत्रशक्तीने यंज्ञ पेटवताना त्यातील विज्ञानाचेही महत्व उलगडून सांगण्यात आले. तसेच तांब्यात भूत पकडणे, पांढऱ्या कपड्यातून हार काढणे अशा विविध प्रयोगांमधील विज्ञानाचे खरे रहस्यही या वेळी उलगडून सांगण्यात आले.
हसत खेळत व्याकरणाचे धडे
मराठी व इंग्रजी विषयांतील व्याकरणाची अनेक विद्यार्थ्यांना भिती वाटत असते. गाण्यांच्या माध्यमातून व्याकरणातील महत्वाचे नियम, सूत्र सोप्या पद्धतीने उलगडून सांगत विद्यार्थ्यांनी व्याकरणाची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला. समानार्थी, अनेकवचनी, एकवचनी यांसह विविध व्याकरणाच्या प्रकारांवर आधारित खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन हसत खेळत व्याकरणाचे धडे गिरवले. तसेच कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील मन मंदिराचा सूर छेडल्यानंतर जे काजव्यांचे दर्शन घडते, तो अभिनव प्रयोगही यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केला. पहिलीच्या मुलांनी चेस खेळाच्या नियमांची माहितीही यावेळी प्रात्यक्षिकांतून दिली.