‘मानवधन’च्या शिक्षकांनी गिरवले ‘इंटिग्रल’ शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:27 AM2018-04-29T00:27:20+5:302018-04-29T00:27:20+5:30
प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव, खेळ, नावीन्यपूर्ण उपक्र म, योगा यांसह दृकश्राव्य माध्यमांद्वारे ज्ञानार्जन करून मानवधन संस्थेच्या शिक्षकांनी इंटिग्रल शिक्षण पद्धतीची तीन मूलभूत तत्त्वे समजून घेतली.
नाशिक : प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव, खेळ, नावीन्यपूर्ण उपक्र म, योगा यांसह दृकश्राव्य माध्यमांद्वारे ज्ञानार्जन करून मानवधन संस्थेच्या शिक्षकांनी इंटिग्रल शिक्षण पद्धतीची तीन मूलभूत तत्त्वे समजून घेतली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बेजन देसाई फाउंडेशन व मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इंटिग्रल शिक्षणावर आधारित सातदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मानवधन संस्थेच्या विविध शाळांतील शिक्षकांनी या समग्र शिक्षण पद्धतीचे (इंटिग्रल) स्वरूप समजून घेतले. या कार्यशाळेसाठी पाँडेचेरी येथील अरविंदो सोसायटी शिक्षण संस्थेचे संचालक शिवकुमार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिवकुमार यांच्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शकही सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी संस्थापक प्रकाश कोल्हे, बेजान देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज टिबरेवाल, आश्विनीकुमार भारद्वाज, ज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवताना त्यांचा भावनिक, बौद्धिक व शारीरिक विकास घडवून आणला पाहिजे. तसेच मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांवर संस्कारही घडवले पाहिजे. या सर्वांचा अंतर्भाव करूनच अध्ययन व अध्यापन झाले तर आदर्श समाजनिर्मिती होऊ शकते, असेही यावेळी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
दृकश्राव्य पद्धतीने प्रशिक्षण
कार्यशाळेत शिवकुमार यांनी इंटिग्रल शिक्षणाचे स्वरूप, संकल्पना, तीन मूलभूत तत्त्वे उलगडून सांगितली. तसेच मुंबई येथील रिद्धी शहा, जास्मीन संपत यांनी प्रात्यक्षिके, खेळ, उपक्र म, योगा व दृकश्राव्य प्रत्यक्ष अनुभव या पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण दिले.