तरुणांना पोलिसांकडून शिस्तीचे धडे
By admin | Published: February 17, 2016 11:53 PM2016-02-17T23:53:28+5:302016-02-17T23:55:23+5:30
अंबड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पुढाकार
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात येण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सिडको, तसेच परिसरातील गुन्हेगारांना बोलावून त्यांना गुन्हेगारी व भाईगिरीपासून परावृत्त करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी गुन्हेगारीकडे झुकत चाललेले व काही अगोदरपासूनच गुरफटलेले अनेक तरुण गुन्हेगार बैठकीला उपस्थित होते.
पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशान्वये अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत सिडको, अंबड तसेच परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असलेल्या तरुणांना सहभागी करण्यात आले होते. यावेळी बर्डेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज तरुण वर्गाचे गुन्हेगारी व भाईगिरीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु त्यांना आपण चुकीच्या मार्गाकडे वाहून जात असल्याची जाणीव होत नसल्याने त्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. स्वत:ला भाई समजणारे अट्टल गुन्हेगार हे तरुणांना यात सहभागी करून घेतात व त्यांच्या आयुष्याचे नुकसान करीत असतात. तरी तरुणांनी भाईगिरीचा मोह सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज असल्याचे बर्डेकर यांनी सांगितले. गुन्हेगारी व भाईगिरीत अडकल्याने काही दिवसांतच त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. तसेच समाजात गुंडगिरीचा शिक्का बसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलतो. तसेच एकदा गुन्हेगारीचा शिक्का बसला की चांगली नोकरीदेखील मिळत नाही. यासाठी तरुणांनी या भाईगिरीकडे न वळता समाजाच्या प्रवाहात यावे. तसेच क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी बर्डेकर यांनी केले. या बैठकीला टिप्पर गॅँग, राकेश कोष्टी गॅँग, प्रणय बोरसे गॅँग यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकत चाललेले तरुण यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)अंबड पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीप्रसंगी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असलेल्या तरुणांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर.