रिक्षाचालकांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे
By admin | Published: November 27, 2015 10:33 PM2015-11-27T22:33:29+5:302015-11-27T22:34:08+5:30
रिक्षाचालकांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे
नाशिक : सुरक्षित वाहन कसे चालवावे यासाठी शाळकरी मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने आता रिक्षाचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता या प्रशिक्षणवर्गाचा शुभारंभ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तिडके कॉलनीतील तूपसाखरे लॉन्सच्या पाठीमागील बाजूस महापालिका आणि नाशिक फर्स्ट या संस्थेच्या वतीने ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क साकारण्यात आला आहे. बालवयातच मुलांना वाहतूक नियमाचे धडे मिळावे यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत तीन हजार मुलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांनी दिली.
या प्रशिक्षणासाठी शाळा मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्या तरी आता दर शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रदीप म्हसकर यांच्या सहकार्याने सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील माहितीपट उपलब्ध असून, तोही संंबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात रिक्षाचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून दोन दिवसांत ६० याप्रमाणे वर्ग घेतले जातील, तर त्यानंतर बसचालक आणि ट्रकचालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)