हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:17+5:302021-02-15T04:14:17+5:30
रविवारी (दि.१४) शहराला व्हॅलेन्टाईन दिना सर्वत्र साधेपणाने तर कुठे चोरीछुपे साजरा झाला. मागील आठवडाभरापासून तरुणाईने विविधप्रकारे ‘व्हॅलेन्टाईन वीक’ साजरा ...
रविवारी (दि.१४) शहराला व्हॅलेन्टाईन दिना सर्वत्र साधेपणाने तर कुठे चोरीछुपे साजरा झाला. मागील आठवडाभरापासून तरुणाईने विविधप्रकारे ‘व्हॅलेन्टाईन वीक’ साजरा करत आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालविला. गुलाबापासून तर टेडी अन् चॉकलेटपर्यंत विविधप्रकारे भेटवस्तु देत आपल्या आवडत्या व्यक्तीचे मन जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. यंदा कोरोनाचे सावट कायम राहिल्याने महाविद्यालयांचे प्रवेशद्वार बंदच राहिले. त्यामुळे एरवी तरुणाईने बहरुन जाणारा कॉलेजरोड या रविवारी काहीसा वेगळाच जाणवला. रविवारची सुटी अन् चवदार मिसळीचा बेत हे जणू नाशिककरांचे समीकरणच राहिल्याने अनेकांनी शहरासह शहराजवळच्या खेड्यांवर नव्याने सुरु झालेल्या ‘मिसळ पॉइंट’ला भेटी देत आपल्या ‘व्हॅलेंटाइन’सोबत दिवस गोड केला. यामुळे शहरातील मिसळची जवळपास सर्वच ठिकाणे हाऊसफुल्ल झाली होती. सकाळपासून शहरातील कॅफे, रेस्टॉरंटसह पर्यटनस्थळांवर तरुणाईसह नाशिककरांनी गर्दी केली.
---इन्फो--
कॅफे, रेस्टॉरंट अन् रिसॉर्टचे पालटले रुप
गिफ्ट, केक शॉप्सपासून तर कॅफे, रेस्टॉरंट, रिसॉर्ट सजलेले पहावयास मिळाले. बहुतांश व्यावसायिकांनी आपल्या दुकानांपुढे हृदयाच्या आकारात फुग्यांची सजावट केल्याचे दिसून आले. काहींनी दुकानांमध्ये लाल, पांढरे-गुलाबी रंगाची फुगे लावून वातावरण रोमॅन्टिक करण्याचाही प्रयत्न केला. शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगर, पंडित कॉलनी, थत्तेनगर, सावरकरनगर, इंदिरानगर, अशोकामार्ग आदी भागातील कॅफे, रेस्टॉरंट, केक शाॅप यांचा नूर पालटलेला दिसून आला.
---इन्फो--
बोट क्लबसह निसर्गरम्य स्थळांना पसंती
व्हॅलेन्टाईन दिनाचा आनंद लुटताना तरुणाईने आपल्या प्रिय व्यक्तीसोबत ‘डेटिंग’लाही पसंती दिली. शहराबाहेरील निसर्गरम्य स्थळांसह गंगापूर धरणालगत साकारण्यात आलेला बोट क्लब नाशिककरांच्या गर्दीने फुलला होता. अंजनेरीचा घाट परिसरासह त्र्यंबकेश्वरमधील ब्रम्हगिरीचा निसर्गरम्य परिसरासह हरसूल-वाघेरा रस्त्यावरील काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, भावली धरण परिसरांमध्ये दिवसभर तरुणाईच्या प्रेमाला भरते आले होते.
--इन्फो--
आज ‘कॅम्पस’मध्ये ‘व्हॅलेन्टाईन डे’ सेलिब्रेशन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून महाविद्यालयांचे प्रवेशद्वार बंद राहिले. सोमवारी (दि.१५) महाविद्यालये पुन्हा गजबजणार असून कॅम्पसमध्ये रविवारी साजरा झालेल्या व्हॅलेन्टाईन दिनाचे ‘सेलिब्रेशन’ पहावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटल्यावर कॅम्पसमधल्या कट्ट्यावर गप्पा रंगविताना ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा केला जाणार आहे. \
-