सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने आठवण ठेवावी : प्रभूदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:59 AM2018-05-08T00:59:02+5:302018-05-08T00:59:02+5:30
कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात.
नाशिक : कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. अशा परिस्थितीत देशवासीयांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या धैर्य व त्यागाची समाजाने आठवण ठेवून प्रत्येक सैनिकाबद्दल भारतीयाला आदर आणि अभिमान असायला हवा, असे मत अनुराधा प्रभूदेसाई यांनी येथे व्यक्त केले. गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेचे सातवे पुष्प प्रभूदेसाई यांनी सोमवारी (दि. ७) गुंफले. माजी खासदार दिवंगत अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ऋणानुबंध सैनिकांशी-कारगिलची शौर्यगाथा’ या विषयावर बोलताना अनुराधा प्रभूदेसाई यांनी लेह, लडाख, द्रास, कारगिल प्रांतात प्राणपणाने झुंज देणाºया सैनिकांचे जीवनमान नाशिककरांसमोर मांडले. ज्या सैनिकांचे अदम्य साहस आणि शौर्याच्या जोरावर आपण देशात सुरक्षित आहोत त्या सैनिकांच्या त्यागाची समाज आठवण ठेवत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, बॉलिवूडच्या तारेतारकांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची माहिती प्रत्येकाला असते. परंतु देशातील परमवीरचक्र सन्मानित सैनिकांची नावे आपल्याला माहिती नाहीत, ही शोकांतिका आहे. कारगिल युद्धातील पहिले शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांचे बलिदान आणि नंतरच्या यातना आपल्याला ठाऊक नाही. कॅप्टन विक्र म बात्रांचे कार्य माहिती नाही. काश्मीर किंवा अरुणाचलसारखा प्रदेश आपल्या नकाशावरून पुसला जातो आणि आपला नकाशा लहान होतो, यांसारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. देशाच्या सीमेचे रक्षण, पलटन की इज्जत या गोष्टींसाठी आपला सैनिक बर्फवृष्टी, हिमप्रपात, गोळीबार यांची पर्वा न करता तिथे उभा असतो, त्याची आठवण ठेवून सर्वांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.