सज्ञान युवकांना पालकांनीच मुक्त निर्णय घेऊ द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:08 IST2018-12-24T00:07:39+5:302018-12-24T00:08:05+5:30
बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे.

सज्ञान युवकांना पालकांनीच मुक्त निर्णय घेऊ द्यावेत
माझे मत
नाशिक : बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे. खरे तर बदलत्या काळात जातीय अभिनिवेश कमी होण्याची गरज असताना ते वाढत आहेत. याविषयी युवा पिढीने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मुले आणि मुली कायद्याने सज्ञान असल्याने त्यांना त्यांचे भले-बुरे कळत असल्याने त्यांच्यावर जातीयवाद लादू नका, अशाप्रकारची भूमिकाही युवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली. आंतरजातीय विवाह ही खरे तर बदलत्या काळात समस्याच होऊ शकत नाही, परंतु तरीही आॅनर किलिंगच्या नावाखाली हत्याकांड होत असतात. सैराट या अलीकडच्या काळात गाजलेल्या चित्रपटामुळे खरे तर सामाजिक विषयावर प्रकाश पडल्याने अशाप्रकारच्या घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे मतही युवकांनी व्यक्त केले.
बदलत्या परिस्थितीनुसार युवा पिढी समजदार आणि परिपक्व झाली आहे. विवाहासह सर्वच विषयांबाबत निर्णय घेण्यास
सक्षम असतात. परंतु पालकांची संमती घेतल्यास अनेक समस्या टळू शकतात. - कुणाल वाघ, के. के. वाघ कॉलेज
शिक्षित झाल्यामुळे सर्व मुलांना चांगला आणि वाईट यातील भेद चांगला कळतो. अठरा वर्षांची मुलगी आणि एकवीस वर्षांचा मुलगा असेल तर ते कायद्याने सज्ञान असतात. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार कोण हवा हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.- धनश्री बत्तासे, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय
देशभरात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहे, परंतु दुसरीकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही. आपल्याच धर्मात अथवा जातीत विवाह केल्यास कोणत्याही प्रकारे वाद होत नाहीत किंवा मुला-मुलींचे वैवाहिक जीवन चांगलेच होते असे नाही. मात्र तरीही त्यासाठी आग्रह धरला जातो. आता पालकांचीदेखील मानसिकता बदलण्याची गरज आहे. - पूजा दराडे, बिटको कॉलेज
मुलगा आणि मुलगी दोघे कायद्याने सज्ञान असतील आणि दोघेही समजूतदार असतील तर घरातील मोठ्या मंडळींनी त्यांना त्यांचा निर्णय घेऊ देणे उचित आहे. परंतु दुर्दैवाने आंतरजातीय विवाहाबाबत पालक ‘लोक काय म्हणतील’ याचा जास्त विचार करतात आणि त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात. पालकांनी लोक काय म्हणतील यापेक्षा मुलांना काय वाटते याकडे लक्ष दिले पाहिजे.
- कल्याणी पोळ, बीवायके कॉलेज