आपले नांदुरमध्यमेश्वर रामसर अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘लाइव्ह’ संदेश
By अझहर शेख | Published: June 5, 2023 05:40 PM2023-06-05T17:40:02+5:302023-06-05T17:40:39+5:30
‘मिशन लाइफ’ अभियानांतर्गत जीवन आणि शाश्वत विकासाची लक्ष्ये जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक - सभोवतालच्या पर्यावरणाला हवामान बदलाच्या प्रभावांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एकेरी प्लॅस्टिकचा वापर तत्काळ थांबविणे गरजेचे आहे. देशभरातील ७५ रामसर स्थळांमध्ये नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचाही समावेश आहे. हे अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवण्याची शपथ प्रत्येकाने घेऊन कृतीशिल उपाययोजना राबवाव्यात, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे सोमवारी (दि.५) दिला.
‘मिशन लाइफ’ अभियानांतर्गत जीवन आणि शाश्वत विकासाची लक्ष्ये जाहीर करण्यात आली आहे. मिशन लाइफ ही जागतिक चळवळ असून ती आपल्या पर्यावरणाला हवामान बदलांच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविली जात आहे. याअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध ७५ रामसर दर्जाच्या पर्यावरणपुरक नैसर्गिक स्थळांवर शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. येथील सभागृहात नाशिक वन्यजीव विभागाकडून प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देशभरातील रामसर दर्जाच्या नैसर्गिक स्थळांवर पर्यावरणपुरक उपक्रमांची माहिती घेतली. तसेच नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या संदेशातून शाश्वत विकासाची लक्ष्ये व प्लॅस्टिमुक्त पर्यावरणाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी नाशिक वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक तृप्ती निखाते, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रक्षेपण संपल्यानंतर उपस्थितांकडून आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अभयारण्य आवार स्वच्छता फेरी घेण्यात आली.
‘प्लॅस्टिकचा भस्मासूर रोखणार....’
‘आपली शाळा, गावाचापरिसर, आपले अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणार अन् प्लॅस्टिकचा वाढता भस्मासूर रोखणार...’ अशी शपथ शालेय विद्यार्थ्यांनी नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात घेतली. यावेळी वन्यजीव विभागाकडून ‘मिशन लाइफ’ या जागतिक पर्यावरणपुरक चळवळीविषयीची माहिती देण्यात आली. अभयारण्याच्या आवारात विविध माहितीफलके उभारण्यात आली होती.