आगामी निवडणुकांमुळे निसाकाच्या मुद्द्याला चाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:36+5:302020-12-06T04:13:36+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यात कोणत्याही निवडणुकीचा माहोल तयार झाला की तालुक्यातील निसाका आणि रासाका ही दोन्ही साखर कारखाने चर्चेची ...
सायखेडा : निफाड तालुक्यात कोणत्याही निवडणुकीचा माहोल तयार झाला की तालुक्यातील निसाका आणि रासाका ही दोन्ही साखर कारखाने चर्चेची मुद्दे ठरतात. तालुक्यात लवकरच ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. तालुक्यातील लासलगाव, उगाव, सायखेडा, ओझर या मोठ्या गावांतील ग्रामपालिका निवडणूक जवळ आल्या आहेत, तर निफाड नगरपंचायत निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासोबत सहकार क्षेत्रातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक येऊ पाहत आहे. एकंदरीत आगामी सहा महिने तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.
नाशिक जिल्ह्यात कॅलिफोर्निया अशी ओळख असणारा निफाड तालुका हा मागील काही वर्षांपासून ‘बडा घर पोकळ वासा’ होऊन बसला आहे. एकेकाळी तालुक्यात सोन्याचा धूर निघत होता अशी आर्थिक परिस्थिती होती. तालुक्यात दोन सहकारी साखर कारखाने, के. के. वाघ शिक्षणसंस्था, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थामध्ये सर्वाधिक संचालक आणि सभासद, संस्थेचे अध्यक्ष आणि सरचिटणीसपद अबाधित राखणारा तालुका, नाशिक जिल्हा बँकेत दोन संचालक असणारा तालुका, सलग दहा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पद, तालुक्यातील मोठमोठ्या विविध सामाजिक संस्था, सहकारी सोसायट्या असा सामाजिक, राजकीय आलेख उंचावणारा तालुका आज केवळ गटतटाचे राजकारण आणि वैयक्तिक हित जोपासण्यात गुंतला आहे.
इन्फो
नुसत्या आश्वासनांचा गोडवा
निसाका आठ वर्षांपासून, तर रासाका तीन वर्षांपासून बंद आहे. निसाका अखेरची घटका मोजत आहे, तर रासाका इच्छाशक्तीअभावी बंद आहे. शासनाच्या लालफितीत रासाका अडकला आहे. कारखाने सुरू करण्यासंबंधी प्रत्येक निवडणुकीदरम्यान सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ग्वाही मिळते. स्थानिक राजकारण्यांकडून आश्वासने दिली जातात. आता आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले आणि बंद कारखाने पुन्हा चर्चेत आले.