चला मुलानो उठा उठा, स्मार्ट स्मार्ट खेळू चला!

By admin | Published: November 3, 2015 11:47 PM2015-11-03T23:47:40+5:302015-11-04T00:08:25+5:30

चला मुलानो उठा उठा, स्मार्ट स्मार्ट खेळू चला!

Let's raise the children, play smart smart! | चला मुलानो उठा उठा, स्मार्ट स्मार्ट खेळू चला!

चला मुलानो उठा उठा, स्मार्ट स्मार्ट खेळू चला!

Next

हेमंत कुलकर्णी

  • (इंग्रजी माध्यमाची कोणतीही मराठी शाळा)

नुकतीच प्रार्थना संपली आहे
प्रिन्सीपल- बॉईज अ‍ॅन्ड गर्ल्स, आज आपल्या शाळेत एक खास पाहुणे येणार आहेत. प्रवीण सर! ते आपल्याला एक नवा खेळ सुचवणार आहेत. खेळाचे नाव ‘स्मार्ट नाशिक’.
अरे, पाहा, सर आलेच.
या सर. गुड मॉर्नींग!
ँप्रवीण सर- हेल्लो माय फ्रेन्डस्. टुडे अ‍ॅम गोईंग टू टेल यू फ्यू इंटरेस्टींग थिंग्ज....
(प्रिन्सीपल प्रवीण सरांच्या कानी लागतात. सर शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी पोरंपोरी मराठीच आहेत. त्यांना इंग्रजीपेक्षा मराठीच पटकन समजतं)
प्रस- ओक्के! तर मुलानो, मी काय सांगत होतो? हां. जसे तुम्ही स्मार्ट, तुमची शाळा स्मार्ट, तुमचे प्रिन्सीपल स्मार्ट (प्रिन्सीपल ओशाळून लग्नातल्या कोटाच्या बटनाशी खेळू लागतात) तसंच आपल्याला आपलं नाशिकसुद्धा स्मार्ट बनवायचं आहे. सांगा बरं, त्यासाठी काय काय करावं असं तुम्हाला वाटतं?
(सगळी पोरंपोरी एकमेकाकडं बावचळून बघू लागतात. प्रिन्सीपलच्या दिशेने बघतात. पण ते तर अधिकच बावचळलेले)
प्रस- ठीक आहे. मीच तुम्हाला सोपे प्रश्न विचारतो. तुम्हाला चकचकीत रस्ते, शुद्ध आणि स्वच्छ पाणी, हिरवीगार झाडे, आकर्षक एसी बसगाड्या, जाल तिथे वायफाय व तेही फुकट, सिनेमाच्या तिकिटाचं बसल्या जागी बुकींग, असं खूप खूप काही तुम्हाला पाहिजे ना?
(पोरांच्या तोंडावरचा मख्खपणा तसाच)
प्रस-बरं. मीच आता तुमच्यापैकी एकेकाला बोलतं करणार आहे. बोल, (एकाकडे बोट दाखवून) तुझ्यापासून सुरुवात करु
पहिला मुलगा-सर, मी कॉलेज रोडवर राहतो. तो रस्ता चकचकीतच आहे.
दुसरा- सर आमच्या घरी पिण्याच्या पाण्याचे बुधलेच आम्ही मागवतो.
तिसरी-सर, आमच्या घरच्या बागेत लॉन आहे, फळा-फुलांची निरनिराळी झाडंही आहेत
चौथा- सर मी पप्पांच्या गाडीतून येतो, ती एसीच आहे.
पाचवी-सर, आमच्या घरातल्या प्रत्येकाकडं फोर-जीचं कनेक्शन आहे.
सहावा: सर, बुक माय शोचं अ‍ॅप आहे ना माझ्याकडं.
प्रवीण सर गडबडून जातात. काय बोलावं काही सुचत नाही. त्यांच्या गडबडण्यानं प्रिन्सिपल अधिकच बावचळतात. कसनुसा चेहरा करुन बोलायला उठतात.
प्रि-बॉईज अ‍ॅन्ड गर्ल्स, प्रवीण सरांनी आज आपल्याला खूप खूप महत्वाची माहिती दिली आहे. प्रवीण सरांच्या मेहनतीनं ते लवकरच स्मार्ट होणार आहे.
(पाठीमागून आवाज येतो, मग आज का ते बेंगरुळ आहे? पण प्रि. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात)
तेव्हां आपण सारे आता प्रवीण सरांचे आभार मानू या.
(लवकर सुटका झाली हा आनंद चेहऱ्यावरुन ओसंडणारी मुलं एका सुरात)
थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच

  • (महापालिकेची कोणतीही शाळा)

रखरखीत वाळूवर मुलं आडवी तिडवी कशीही उभी राहिलेली. तितक्यात हेडगुरुजी येतात.
हेडगुरुजी- कारे माजलात का, नीट उभं राहात येत नाही.
गुर्जी, रेती चटकायलीय
हे- गप्प बसा आणि लाईनीत उभे राहा. मोठ्ठे साहेब येतीनच इतक्यात. ते आल्यावर खाली दप्तरावर बसा, चटके बसणार नाहीत
(साहेब आले, साहेब आले)
हेडगुर्जी कण्हेरीची दोन फुलं, कण्हेरीचीच सहा पानं आणि खराट्याच्या चार काड्यांचा ‘बुके’ साहेबाच्या हातात टेकवतात. साहेब त्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करतात. शिपाई गुपचूप तो बुके ताब्यात घेतो.
हे-मुलांनो, आज प्रवीण साहेबांचे पाय आपल्या शाळेला लागले. भाग्याचा दिवस. (प्रवीण सरांकडे ओशाळून पाहातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तांबडंपण लक्षात येतं आणि तनमाचं तेल आटवतात) तर सर आपल्याला काही भारी भारी गोष्टी सांगणार आहेत. या सर, आपण सुरु करा.
(प्रवीण सर इंग्रजी माध्यमाच्या मराठी शाळेत वाजवलेलीच तबकडी वाजवतात.
पोरं सारख्या मांड्या बदलून वाळूचे चटके सहन करायच्या प्रयत्नात)
प्रस-तर आता सांगा मुलानो, मी तुम्हाला स्मार्ट म्हणजे मघाशी तुमचे मुख्यध्यापक म्हणाले त्याप्रमाणे ‘जंटलमेन’ नाशिकची कल्पना दिली.
आता तुम्ही एकेक करुन बोला.
पहिला मुलगा: सायेब, चकच्यकीत रस्ते म्हंजी? आन त्ये केल्यानं काय फैदा?
दुसरा- सायेब, फाटं मोप पानी येतं.
कंदी कंदी ते भराय कुनीबी नस्तं, तवा पार सांडून जातं. आजून काय पायजे?
तिसरा-पयले झाडं होतीच की. ती कुनी तोडली? आन आता नव्यानं कशापायी लावायची, तोडायसाठी?
चौथा- ते एशी बशीत मोफतात बसायाला मिळंल का पैका द्यावा लागंल?
पाचवा: सायेब,
तुम्ही हायफाय हाय हे गुर्जी बोल्ले होते, पन ते वायफाय काय राहतं? सहावा-गणपतीच्या टायमाला फुकटात शिनेमा बघायला भेटायचा. पन ते बंद झालं. ते पुन्यांदा सुरु व्हईल का?
आपली पोरं काय चटापटा बोलतात, हे बघून आणि ऐकून हेडगुर्जी बेहद्द खुष. विजयी मुद्रेने प्रवीण सरांकडे बघतात आणि बापरे. त्यांच्या चेहऱ्यावरील तांबडेपण लालबुंद झालेलं. हेडगुर्जींचं ओशाळून ओशाळून पाणी होऊन गेलं. पण त्या पाण्याकडे ढुंकूनदेखील न बघता प्रवीण सर ताडताड तिथून निघून जातात आणि आपलं दप्तर गाठतात.
‘ब्लडीफूल्स, इडियट्स, डंडरहेड्स, काही अर्थ नाही, या लोकांमध्ये. मी यांच्यासाठी मरमर मरुन राहालो (माणूस चिरडला की अस्सल मायबोली पाझरते)पण या भैताडांले त्यांचं काहीच नाही नं बावा. मरु दे ना मग त्यान्ले तिठंच ’
शिपायाने आधीच उघडून ठेवलेल्या केबीनमध्ये साहेब धाडकन घुसतात.
ओळीने उभ्या असलेल्या पीएपासून अ‍ॅडीशनलपर्यंत कोणालाच साहेबांना अचानक काय झालं हे काहीच कळत नाही. सवयीनं साहेब आपल्यावरच रागावला असेल असं गृहीत धरुन उगाचाच एक सुरात सारे ‘सॉरी सर, सॉरी सर’ म्हणत बसतात. पण साहेबाचं त्यांच्याकडे लक्ष असतं कुठं?
साहेबांचं डोकं केव्हांचंच त्याच्या स्मार्ट फोनात घुसलेलंं,
सारे अपडेट्स चेक करण्यासाठी!!!

Web Title: Let's raise the children, play smart smart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.