कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र मोहीम
By admin | Published: July 21, 2016 01:45 AM2016-07-21T01:45:03+5:302016-07-21T01:59:21+5:30
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र मोहीम
नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा, भर चौकात अशा गुन्हेगारांना आणून जनतेच्या हवाली करा या आणि अशा विविध मागण्यांचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची मोहीम बुधवारी (दि. २०) एचपीटी, आरवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राबविण्यात आली.
या पत्रमोहिमेअंतर्गत महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटना यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा तसेच कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणती शिक्षा देण्यात यावी, असा उल्लेख या पत्रांमध्ये करण्यात आला आहे. या मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विविध मागण्या मांडल्या.
सदर अहवाल आणि या मोहिमेत सहभागी पत्रांच्या संख्येचा तपशील मुख्यमंत्र्यांना कुरिअरने पाठविण्यात येऊन काही महिन्यांच्या अंतराने माहितीच्या अधिकाराखाली मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढाव्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन. सूर्यवंशी, प्रा. डॉ. विद्या पाटील, आसावरी कुलकर्णी, भक्ती आठवले, सौरभ बेंडाळे, राकेश पाटील, आशिष कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)