जिल्ह्यातील २७३ घरांचे पत्र उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:47+5:302021-05-19T04:15:47+5:30
नाशिक : अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात ...
नाशिक : अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वादळात शाळा तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेही नुकसान झाले. गुजरात सीमेलगत असलेल्या पेठ आणि सुरगाणा तालुक्याला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यातील एकूण ९६ गावांमधील नागरिकांना वादळाचा सामना करावा लागला.
‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून जिल्ह्यातील सुरगाण्यासह पाच तालुक्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल भागातील काही घाटमाथ्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तविला होता. या वादळात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, देवळा, चांदवड, निफाड तसेच सिन्नर तालुक्यातील मालमत्तेचे नुकसान झाले.
सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ११२ घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. त्यापाठोपाठ पेठ तालुक्यात ६५ घरांचे नुकसान झाले. कळवण तालुक्यात ५६ घरांची पडझड झाली असून दिंडोरीत आठ घरांचे नुकसान झाले. देवळा, चांदवड सिन्नर, निफाड मध्येही काही घरांना फटका बसला. त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पडझड झाली. त्याबरोबरच सुरागाणा येथेही चार शाळांचा काही भाग कोसळला. या तालुक्यांमध्ये प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेदेखील नुकसान झाले. काही ठिकाणी शेडनेट, कांदा चाळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वादळामुळे जिल्ह्यातील आंबा तसेच भाजीपाला पिकांचादेखील नुकसान झाले असून पीक नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देवळा तसेच सिन्नरमध्ये बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
--इन्फो--
दीड हजार शेतकऱ्यांचे नुकसान सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले. शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा चाळीतील कांदादेखील खराब झाला. अनेक तालुक्यांमधील फळबागांचे नुकसान झाले. पेठ तालुक्यातील २०५ हेक्टरवरील आंबा पिकांचे नुकसान झाले तर त्र्यंबेकेश्वर तालुक्यातील ८.८६ हेक्टरवरील आंबा पीकदेखील जमिनीवर आले. सिन्नर तालुक्यातील डाळींब बागादेखील उद्ध्वस्त झाल्या.