ग्रंथालय सप्ताह सोमवारपासून
By Admin | Published: January 10, 2016 12:09 AM2016-01-10T00:09:32+5:302016-01-10T00:09:53+5:30
सावाना : व्याख्याने, परिसंवादात मान्यवरांची मांदियाळी
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने येत्या सोमवारपासून (दि.११) ते १७ जानेवारी या दरम्यान ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. माजी केंद्रीय कायदामंत्री सुब्रमण्यम स्वामी यांचे व्याख्यान हे सप्ताहाचे प्रमुख आकर्षण आहे.
सावानाचे यंदाचे शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष असून, यानिमित्त मान्यवर वक्ते, कलावंत ग्रंथालय सप्ताहात सहभागी होणार आहेत. त्यात सोमवारी (दि.११) कवी मंगेश पाडगावकर यांना काव्य संगीतमय आदरांजली अर्पण केली जाणार आहे. त्यात पीयूष नाशिककर (काव्यवाचन), ज्ञानेश्वर कासार, रागेश्री वैरागकर (गायन), अनिल दैठणकर, मोहन उपासनी, सतीश पेंडसे (वादन) सहभागी होतील. दि. १२ रोजी कै. सावित्रीबाई वावीकर स्मृतिप्रीत्यर्थ अब्दुल कादर मुकादम यांचे ‘मध्य पूर्वेतील तणाव आणि भारतीय मुसलमान’ विषयावर व्याख्यान होईल. दि. १३ रोजी ‘मराठीत दर्जेदार साहित्यनिर्मिती मंदावली आहे’ विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे राहतील, तर सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, श्रीकांत उमरीकर सहभागी होतील. दि. १४ रोजी ‘नांदी ते सर्वात्मका’ हा कै. अन्नपूर्णाबाई डोळे स्मरणार्थ गेल्या १२५ वर्षांतील साहित्य व काव्याचा सांगीतिक रसास्वादाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना व सादरकर्ते अभय माणके असून, अमृता माणके, वैशाली बकोरे आणि रजत कुलकर्णी गायन करतील. त्यांना सुभाष दसककर, नितीन वारे साथसंगत करतील. दि. १६ रोजी ‘रंग त्रितालाचे’ हा तबलावादनाचा अनोखा तालाविष्काराचा कार्यक्रम होईल. संकल्पना व सादरकर्ते पं. जयंत नाईक व शिष्यवृंद आहे. हे सर्व कार्यक्रम ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता होतील.