बससेवेसाठी तीन ते चार दिवसांत परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:54+5:302021-02-17T04:20:54+5:30
नाशिक - महापालिकेच्या शहर बस वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना येत्या तीन ते चार दिवसांत मिळणार असून त्यामुळे मार्चपासून बससेवा ...
नाशिक - महापालिकेच्या शहर बस वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना येत्या तीन ते चार दिवसांत मिळणार असून त्यामुळे मार्चपासून बससेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या या बैठकीत याबाबत माहिती दिली. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीच्या सल्लागार केपीएमजी कंपनीकडून परस्पर बससेवेचा अहवाल तयार करून घेण्यात आल्याने त्यावरून जोरदार खडाजंगी झाली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना सादरीकरण न करताच बैठकीतून बाहेर पाठविण्यात आले.
या कंपनीकडून महामंडळाने कोणत्याही प्रकारचे काम करून घेतले नसल्याने जे काही काम स्मार्ट सिटी कंपनीने करून घेतले असेल त्याचे आर्थिक सर्वदायीत्व स्मार्ट सिटी कंपनीवरच राहील, असा निर्णय देखील घेण्यात आला.
महापालिकेच्या बससेवेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मात्र, मंगळवारी (दि. १६) झालेल्या बैठकीत बससेवेच्या अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. बैठकीस महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सतीश सोनवणे, जगदीश पाटील, शहर अभियंता संजय घुगे, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे,मुख्य लेखापाल नरेंद्र महाजन आदी उपस्थित हाेते.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांशी वरिष्ठ पातळीवर मुंबईत बोलणे झाले असल्याने येत्या तीन ते चार दिवसांत बस ऑपरेशनसाठी आवश्यक असलेला परिवहन मंत्रालयाचा परवाना मिळणार असून त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्च महिन्यात ही सेवा सुरू होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. या बससेवेसाठी स्मार्ट सिटी कंपनीने आपल्या केपीएमजी या सल्लागार कंपनीमार्फत बससेवेबाबतच अहवाल तयार केल्याने त्यावरून गेल्या बैठकीतच संचालक जगदीश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्यानंतर देखील मंगळवारी (दि. १६) बैठकीत सादरीकरण करण्यासाठी केपीएमजीचे अधिकारी उपस्थित होते. त्याबद्दल पाटील यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले. बससेवा हे काम स्मार्ट सिटीअंतर्गत येत असल्याचा दावा स्मार्ट सीटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी केला मात्र, महामंडळाकडून कोणत्याही प्रकारे कंपनीला काम दिल्याची वर्क ऑर्डर नसल्याने महामंडळ त्यासंदर्भात कोणतेही शुल्क देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
इन्फो...
बससेवेसाठी लवकरच भरती
महामंडळासाठी लेखापालासह विविध पदे भरण्यास महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी मनुष्यबळ विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. महामंडळाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या ट्रॅफिक इन्स्पेक्टर व ट्रॅफिक सुपरवायझर या दोन पदांवरील राकेश वाघ आणि रणजित ढाकणे यांच्या प्रतिनियुक्तीस मान्यता देण्यात आली.
इन्फो...
शहर बससेवेसाठी बँकिंग पार्टनर, एस्क्रो अकाऊंट, पेमेंट गेटवेसाठी युनियन बँकेची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली तसेच डिजीटल पेमेंट सोल्युशनसाठी पेटीएम यांना एक वर्षासाठी मान्यता देण्यात आली असून
बससेवेसाठीच्या सिटी लिंक लोगो, वेबसाईट,मोबाईल ॲप्लिकेशन व रूट मॅप याबाबत चर्चा करणेत येऊन मंजुरी देण्यात आली.