परवाना नूतनीकरण दंडात कपात
By admin | Published: March 8, 2016 11:25 PM2016-03-08T23:25:41+5:302016-03-08T23:30:23+5:30
परवाना नूतनीकरण दंडात कपात
नाशिक : मोटार वाहन अधिनियमात सुधारणा करीत उपनियमांमध्ये बदल करून सर्वसामान्य परवानाधारक वाहनचालक आणि मालकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व दंडाच्या रकमेत कपात करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सहमती दर्शविली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने पाठपुरावा केला होता.
राज्य सरकारने एक दिवस परवाना नूतनीकरणाचा उशिराचा दंड पाच हजार इतका तर ट्रक नॅशनल परवाना दीड हजार रुपये इतका केला होता. या अवास्तव दंडाच्या विरोधात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने थेट कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून वाहनचालक व मालकांवर आकारण्यात येणारे भरमसाठ शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. ठाकरे यांनीही त्यास सहमती दर्शवित, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार वांद्रे परिवहन आयुक्त कार्यालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते, आयुक्त श्याम वर्धने, शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात नियोजित संप मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे परवाना नूतनीकरणाचा उशिराचा दंड पाच हजार रुपयांवरून आता पहिल्या पंधरा दिवसांकरिता दोनशे, दोन ते चार महिन्यांकरिता पाचशे, एक वर्षानंतर पाच हजार रुपये दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. ट्रक नॅशनल परवाना शुल्क दीड हजार ऐवजी सातशे रुपये तर योग्यता प्रमाणपत्र प्रतिदिन शंभर रुपयांऐवजी प्रत्येक पंधरा दिवसांकरिता शंभर रुपये आकारण्यात येणार आहे. तात्पुरता परवाना शुल्क एक हजाराऐवजी अडीचशे रुपये इतके करण्यात आल्याची माहिती शिव वाहतूक सेनेचे शेख सिकंदर, शेख मुश्ताक, शेख इरफान मास्टर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)