तोतया आर्मी आॅफिसरचे बिंग फुटले; सीआयडी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:23 AM2018-06-14T01:23:15+5:302018-06-14T01:23:37+5:30
नाशिकरोड : सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या तोतया अधिका-याचे बिंग सैन्यातील अधिकाºयानेच फोडले़ राजहंस सुभाष यादव असे या तोतया अधिकाºयाचे नाव असून, त्यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणी घरमालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी तोतया अधिकारी यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
उपनगर पोलीस ठाण्यात महेंद्र ताराचंद गायकवाड (५४, रचना कॉलनी, आडकेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर २०१७ मध्ये राजहंस यादव एका महिलेसोबत घरी आला व आर्मी आॅफिसर असल्याचे सांगून तुमचे घर कुटुंबीयांसाठी भाडेतत्त्वावर घ्यायचे आहे असे सांगितले़ त्यास नकार दिला मात्र त्याच्या पत्नीने घर आवडल्याचे सांगितल्याने गायकवाड यांच्या पत्नीने घर भाडेतत्त्वावर देण्यास होकार दिला़ यानंतर गायकवाड दांपत्याने दरमहा तीन हजार रुपये भाडेतत्त्वावर घर दिले व पोलिसांत भाडेकरूची माहिती नोंदविण्यासाठी आधार कार्डची मागणी केली मात्र तो वारंवार टाळाटाळ करीत होता़ गायकवाड दांपत्याकडे दि. ४ जून रोजी सैन्यातील अधिकारी आला व घर भाडेतत्त्वावर घेण्यासाठी विचारणा केली़ त्यास राजहंस यादव या सैन्यातील अधिकाºयालाच घर दिल्याची माहिती दिली़; मात्र त्याने कागदपत्रे दिली नसल्याने रूम खाली करून घेणार असल्याचे सांगितले़यानंतर ११ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाडेतत्त्वावर घर मागण्यासाठी आलेला सैन्यातील अधिकारी व पाच माणसे आली व त्यांनी सीआयडीमधून आल्याचे सांगून राजहंस हा सैन्यात अधिकारी नसल्याचे सांगितले़ याबाबत गायकवाड यांनी राजहंस विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्यास अटक केल्याचे वृत्त आहे़
आर्मी आॅफिसरच्या तपासाचे गूढ
राजहंस सुभाष यादव हा तोतया आर्मी आॅफिसर डिसेंबर २०१७ पासून जयभवानी रोड परिसरात राहत असून, त्याने कागदपत्रे देण्यासही टाळाटाळ केली होती़ त्यातच सैन्यातील अधिकाºयाने पाच सीआयडीच्या व्यक्तींनी चौकशी केल्याने राजहंसबाबत गूढ निर्माण झाले आहे़