तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:38 PM2020-02-05T22:38:48+5:302020-02-06T00:47:02+5:30
कॉम्रेड देवरे हायस्कूलमध्ये संगीतकार व गायक संजय गिते यांचा तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतातून मनशक्ती देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिते यांनी विविध गाण्यांतून आणि निवेदनातून शेतकºयांसह विद्यार्थ्यांना जगण्याचे मोल लक्षात आणून दिले.
करंजाड : येथील कॉम्रेड देवरे हायस्कूलमध्ये संगीतकार व गायक संजय गिते यांचा तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतातून मनशक्ती देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिते यांनी विविध गाण्यांतून आणि निवेदनातून शेतकºयांसह विद्यार्थ्यांना जगण्याचे मोल लक्षात आणून दिले.
करंजाड, ताहाराबाद, पारनेर, निताणे, सटाणा, वीरगाव, मुळाणे या भागातील शेतकरीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीमुळे तणावग्रस्त शेतकºयांना जगण्याचे बळ मिळावे यासाठी मविप्र च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी डॉ. प्रशांत देवरे आणि करंजाड येथील देवरे हायस्कूलच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी नीलिमा पवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रामचंद्र रौंदळ, शरद देवरे, राघू अहिरे, अनिल पवार, निखिल आहेर उपस्थित होते.
स्वरातून स्वपर्यंत...
संजय गिते यांनी झाडाला आरोग्य देण्यासाठी केवळ त्याच्या पानांवर औषध देऊन उपयोग नाही तर त्याच्या मुळांना औषध द्यावे लागते याचा दाखला देत तणावावर मात करण्यासाठी वरवर काम करून चालणार नाही तर मनापर्यंत आणि मनाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी अध्यात्म मनोविज्ञान आणि संगीत यांच्या मिश्रणातून एक अत्यंत वेगळी संकल्पनाही त्यांनी मांडली. स्वरातून-स्वपर्यंत कसे जायचे, स्वत:वर प्रेम करायचे, स्वत:शी संवाद कसा करायचा, जबाबदारी कशी घ्यायची, मन मोकळे कसे ठेवायचे, दीर्घ श्वसन आणि प्राणायाम आपल्याला ताला सुरात म्हणजेच संतुलित ठेवते याविषयी त्यांनी विविध गाण्यांतून उपस्थितांचे रंजन केले.