गाय-म्हशीने झुंज देत वाचविले वासराचे प्राण
By admin | Published: September 11, 2015 10:27 PM2015-09-11T22:27:06+5:302015-09-11T22:28:25+5:30
बिबट्याचा हल्ला : शेतमजुराने अनुभवला ‘याचि देही याचि डोळा’ थरार्र
ठाणगाव : बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला केल्यानंतर गाय व म्हशीने बिबट्याशी सुमारे दहा मिनिटे झुंज दिली. शेतमजुराने आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. आपल्या वासराला वाचविण्यासाठी गायीने बिबट्याशी दिलेली झुंज या शेतमजुराने ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. या दहा मिनिटांच्या झटापटीत गाय जखमी झाली आहे.
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात असणाऱ्या ठाणगाव परिसरात नेहमीच बिबट्याचे वास्तव्य असते. ठाणगाव शिवारातील भिकरवाडी भागात विकास संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र निवृत्ती आंधळे यांची शेतजमीन व वस्ती आहे. आंधळे यांची शेतात वस्ती असली तरी ते गावात वास्तव्यास आहेत. वस्तीवर राहणाऱ्या शेतमजुराकडून ते शेती करून घेतात. राजू हांबीर हा शेतमजूर नेहमीप्रमाणे जनावरांना गोठ्यात बांधून झोपी गेला. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास वस्तीवर बिबट्या आला. त्याच्या डरकाळ्यांनी राजू हांबीर जागा झाला. हातात बॅटरी घेऊन तो घराबाहेरील ओट्यावर आला. वस्तीवर आलेल्या बिबट्याने आपला मोर्चा गोठ्याकडे वळविल्याचे त्याने पाहिले.राजूने आरडाओरड करण्यास प्रारंभ केला. मात्र भुकेल्या बिबट्याने आवाजाला न जुमानता गोठ्यातील वारसावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. वासरू मोकळे असल्याने ते गायीमागे लपले. यावेळी गोठ्यात बांधलेल्या गाय व वारसाने बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये वासरू दडून बसल्याचे राजू हांबीर याने पाहिले. गाय व म्हशीच्या तावडीतून वासराला बाहेर काढण्यासाठी बिबट्या प्रयत्न करीत होता. मात्र गाय त्याच्याशी झुंज देत असल्याचे दिसून आले. राजूने तातडीने भ्रमणध्वनीहून वस्तीवर बिबट्या आल्याची माहिती आंधळे व शेजारील शिंदे वस्तीवर दिली. शेतमजुराने गाय व म्हशीचा प्रतिकार पाहून आणखी जोराने आरडाओरड करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बिबट्याने या ठिकाणाहून काढता पाय घेतला. यात गाय जखमी झाली आहे.त्यानंतर आंधळे व ग्रामस्थ आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन वस्तीवर आले. त्यांनी वाहनांचा उजेड करीत व हॉर्न वाजवून बिबट्याला पळवून लावले. शुक्रवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी टी.ई. भुजबळ व शंकर शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी सीताराम शिंदे, रंगनाथ आंधळे, सागर आंधळे, भास्कर आंधळे, किरण शिंदे, दत्तू सांगळे, दामू आंधळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)