प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य घडते : तांबोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:31 AM2018-07-09T01:31:04+5:302018-07-09T01:31:44+5:30
नाशिक : इतिहासातून प्रेरणा घेत प्रतिकूल परिस्थितीविरोधात जिद्दीने उभे राहिले तरच आयुष्य घडते, असा सल्ला पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नाशिक : इतिहासातून प्रेरणा घेत प्रतिकूल परिस्थितीविरोधात जिद्दीने उभे राहिले तरच आयुष्य घडते, असा सल्ला पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मानव अधिकार संवर्धन संघटन या संस्थेतर्फे आयोजित एकलव्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून तांबोळी बोलत होते. सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. ८) हा सोहळा झाला. डॉ. बेनझीर तांबोळी, संस्थेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, श्यामला चव्हाण, डॉ. मिलिंद वाघ, प्रकाश नंदनवरे, दीपक तरवडे आदी विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. तांबोळी म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्याने मिळविलेले गुण ९० टक्क्यांच्या तोडीचे असतात, असेही ते म्हणाले.
डॉ. बेनझीर तांबोळी यांनी पालकांना मुलांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला. शांताराम चव्हाण यांनी समाजातील वाढत्या उन्मादावर चिंता व्यक्त करीत बंधुभाव वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हा सर्वांचा हक्क असून, मुलांनी हिंमत हरू नये, असे डॉ. मिलिंद वाघ यांनी सांगितले. श्यामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सिद्धांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विराज देवांग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘समतेच्या वाटेनं’ व ‘वो सुबह कभी तो आएगी’ ही गीते सादर केली.
सर्वेक्षणातून निवड
खडतर परिस्थितीवर मात करून प्रथम प्रयत्नात दहावी उत्तीर्ण होणाºया शहरातील विविध झोपडपट्ट्या व अन्य भागांतील १८७ विद्यार्थ्यांचा यावेळी एकलव्य गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून या मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.