कॅनॉलमध्ये पडलेल्या चिमुकलीला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:12 PM2021-01-28T18:12:35+5:302021-01-28T18:13:53+5:30
मानोरी : देव तारी त्याला कोण मारी, याप्रमाणे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील पालखेड डावा कालव्यात पडलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला जीवनदान देण्यात यश आले असून, काळ आला होता, पण वेळ नाही, असा प्रकार घडला आहे.
मानोरी : देव तारी त्याला कोण मारी, याप्रमाणे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील पालखेड डावा कालव्यात पडलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला जीवनदान देण्यात यश आले असून, काळ आला होता, पण वेळ नाही, असा प्रकार घडला आहे.
शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी आश्रमाचे व्यवस्थापक नवनाथ जऱ्हाड हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाची चिमुकली जानवी आश्रमाजवळ काम करत असताना दीड वर्षीय चिमुकली खेळत खेळत पालखेड डावा कालव्याजवळ गेली व तिचा तोल गेला. कॅनॉलला आवर्तन सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात सुरू होता. जऱ्हाड यांचे बंधू संदीप जऱ्हाड हे याच वेळी आपल्या शेतात इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी जात असताना त्यांनी जानवी कॅनॉलच्या पाण्यात पडून वाहून जात असल्याचे पाहिले. प्रसंगावधान राखत संदीप यांनी तत्काळ कॅनॉलमध्ये उडी मारून जानवीला पकडून कॅनॉलच्या बाहेर काढत जीवनदान दिले. यावेळी आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्या जानवीला कुशीत घेतले.
शिरसगावच्या पालखेड डावा कालव्याला आवर्तन सुरू असून, जानवी कॅनॉलमध्ये पडल्यानंतर पाण्याला जोर असल्याने जानवी पाण्यावर तरंगत सुमारे ३०० फूट अंतर वाहत गेली. मोटार बंद करण्यासाठी जात असलेले संदीप जऱ्हाड यांनी हा सर्व प्रकार बघितल्यावर तत्काळ कॅनॉलमध्ये उडी मारून वाहत जाणाऱ्या जानवीला बाहेर काढत जीवनदान दिले. .
(२८ जानवी)