दुहेरी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:13 AM2019-03-27T00:13:16+5:302019-03-27T00:13:42+5:30
पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चुलत भावाने बहिणीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले असता त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या महिलेवरही चाकूने वार केल्यानंतर उपचारा दरम्यान त्या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना २०१३ साली शिवाजी चौकात घडली होती.
नाशिक : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चुलत भावाने बहिणीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले असता त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या महिलेवरही चाकूने वार केल्यानंतर उपचारा दरम्यान त्या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना २०१३ साली शिवाजी चौकात घडली होती. या दुहेरी खून प्रकरणी आरोपी नितीन सुभाष पवार यास मंगळवारी (दि.२६) जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व १३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
आरोपी नितीन पवार व त्याची चुलत बहीण मेघा राजेश नवलाख यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहारातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून दोघा चुलत बहीण-भावात वादविवाद झाला. त्याचा राग मनात धरून नितीन ६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघा यांच्या शिवाजी चौकातील राहत्या घरात शिरला व त्याने चाकूने मेघावर वार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आईवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या मुलीचा आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या ऋतुजा या मदतीला धावून आल्या. त्यांच्यावरही त्याने चाकूने हल्ला चढविला. या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश सुचित्रा घोडके यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अॅड. व्ही. एस. तळेकर यांनी युक्तिवाद केला. यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह वैद्यक ीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा व सत्र न्यायधीश घोडके यांनी न्यायालयापुढील साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी नितीन पवार यास दोषी धरले.