दिंडोरी दुहेरी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:17 PM2018-08-24T23:17:03+5:302018-08-24T23:21:11+5:30
नाशिक : वहिवाटी रस्त्याच्या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या दोन दुचाकीवरील पाच जणांना पिकअपने धडक देऊन त्यापैकी दोघांचा खून करणारा आरोपी उत्तम तुकाराम धिवंदे (रा़ पिंपळगाव धुम, ता़ दिंडोरी ,जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़पांडे यांनी शुक्रवारी (दि़२४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी सरकारी वकील योगेश डी़ कापसे यांनी या खटल्यात १४ साक्षीदार तपासून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़

दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धुम येथील रहिवासी वसंत नामदेव बेजेकर व वामन नामदेव बेजेकर या दोघा भावांचे रस्त्याच्या वहिवाटीवरून आरोपी उत्तम तुकाराम धिवंदे सोबत वाद होते़ त्यांची दिंडोरी तहसिलदारांकडे केस सुरू होती़ त्यानुसार २५ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसिलदारांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली होती़ यानंतर धिवंदे व बेजेकर यांच्यामध्ये वादावादी झाल्याने बेजेकर बंधू हे बाळकृष्ण काशिद व संपत गांगुर्डे व आणखी एकासोबत पोलिसात तक्रार करण्यासाठी दोन दुचाकींवरून निघाले़ यावेळी आरोपी उत्तम धिवंदे याने तुम्ही तक्रार देण्यासाठी जातातच कसे तुमचा रस्त्यातच गेम करतो अशी धमकी दिली़
बेजेकर बंधू हे उमराळे खडकी रोडवरून जात असताना आरोपी उत्तम धिवंदे याने पिकअप वाहनाने या दोन्ही दुचाकींना पाठिमागून जोराची धडक दिली़ यामध्ये बाळकृष्ण काशिद व संपत गांगुर्डे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर फिर्यादी वसंत बेजेकर व त्यांचा भाऊ जखमी वामन बेजेकर व आणखी एक जबर जखमी झाले होते़ या पिकअपमध्ये भास्कर तुकाराम धिवंदे, बाकेराव तुकाराम धिवंदे,तुकाराम मुरलीधर धिवंदे, मनिषा बाकेरा व धिवंदे रमेश सुका कोराळे बसलेले होते़ या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले होते़
या दुहेरी खून खटल्यात न्यायाधीश पांडे यांनी आरोपी उत्तम धिवंदे यास दोषी धरून त्यास जन्मठेप व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाखाली ५ वर्ष सक्तमजुरीची व पंधरा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तर उर्वरीत पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ या दोन्ही शिक्षा कंकरंट भोगावयाच्या असून या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांनी केला होता़