पत्नीचा गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप; चारित्र्याच्या संशयातून लाकडी दांड्याने केली होती मारहाण
By नामदेव भोर | Published: May 12, 2023 07:52 PM2023-05-12T19:52:40+5:302023-05-12T19:53:10+5:30
या प्रकरणातील आरोपी पती बाळू पंडित खेटरे (३५, रा.वासाळी गाव) याला जन्मठेपेसह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नाशिक : पत्नीच्या चारित्र्यावर संशयत घेत पतीने तिला लाकडी दांड्याने मारहाण करत गळा दाबून हत्या केल्याची घटना २०२० मध्ये सातपूर भागातील वासाळी येथे घडली होती. याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.१२) निकाल देताना या प्रकरणातील आरोपी पती बाळू पंडित खेटरे (३५, रा.वासाळी गाव) याला जन्मठेपेसह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सातपूर पोलिस ठाण्याच्या गद्दीत १२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री आठ ते अकरा वाजेदरम्यान, वासाळी येथील घरी बाळू खेटरे याने पत्नी वैशाली बाळे खेटरे (२७,रा. वासाळी ) हिच्या चारित्र्यावर संशय घेत दोन दिवसापूर्वी दुपारच्यावेळी घराबाहेर जाण्याविषयी जाब विचारत कुरापत काढून हाताच्या चापटीने तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली, त्याचप्रमाणे तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारल्याने बाळे खेटरे विरोधात सातपूर पोलिस ठाण्यात पत्नी वैशालीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे यांनी सखोल तपास करून न्यालायालात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी, यांनी फिर्यादी,साक्षीदार, पंच याच्या साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्याआरोपी बाळू खेटरे याला जन्मठेपेसोबतच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिने साध्याकारावासाठी शिक्षाही न्यायालयाने आरोपीला सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणात सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. योगेश कापसे , ॲड. रेश्मा जाधव व राजेंद्र बघडाणे यांनी कामकाज पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणू सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. एस. काकड , पोलिस नाईक वाय. डी. परदेशी, यांनी पाठपुरावा केला.