रिक्षाचालक प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चौघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:38 PM2018-09-04T23:38:39+5:302018-09-04T23:40:13+5:30
नाशिक : किरकोळ कारणावरून कुरापत काढून रिक्षाचालकावर हल्ला करून त्याचा खून करणारे आरोपी अंजुम कुतुबुद्दीन मकराणी (४७), अरशद कुतुबुद्दीन मकराणी (४४), मकदुमरजा ऊर्फ दानिश अंजुम मकराणी (२३), अमजद कुतुबुद्दीन मकराणी (४५) या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ भद्रकालीतील हेलबावडी मशीदजवळ २१ डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती़ या खटल्याच्या निकालामुळे भद्रकाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

भद्रकालीतील हेलबावडी परिसरात आरोपी अंजुम मकराणी याचे रेशन दुकान आहे़ या ठिकाणी रस्त्यावर रिक्षा लावण्याच्या कारणावरून चालक रियाज शेख यांच्याशी वाद झाला होता. या वादाची कुरापत काढून चौघा आरोपींनी सुरा, चॉपरने रियाज शेख (३८) याच्यावर हल्ला करून फरार झाले होते़ जखमी शेख यांना शहेबाज शेख यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान २५ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता़
न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी पंधरा साक्षीदार तपासले़ यामध्ये चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पाच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ या चौघांविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश घोडके यांनी जन्मठेप व १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंडाची रक्कम मयत शेखच्या कुटुंबीयांनी देण्याचे आदेश दिले़
दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अंजुम मकराणी याच्या विरोधात नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यामध्ये सात वर्षांची शिक्षाही झालेली आहे. अन्य तीन आरोपींविरोधात प्रत्येकी तीन गुन्हे दाखल असून त्यांची परिसरात दहशत होती़