‘गुरुगौरव’ मैफलीतून उलगडला जीवनप्रवास
By admin | Published: September 14, 2016 12:30 AM2016-09-14T00:30:58+5:302016-09-14T00:31:32+5:30
इंदिरानगर : राजाभाऊ देव जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम रंगला
नाशिक : अमीर रागातील ‘चमेली फुली चंपा’, किराणा घराणे राग दरबारी कानडातील ‘और नही कछू काम’ ही पारंपरिक बंदिश तसेच पंडित राजाभाऊ देव यांची खासियत असलेला ‘पलटा भीम पलाशी’ या आणि अशा विविध रागांचे सादरीकरण डॉ. अलका देव-मारूलकर यांनी ‘गुरुगौरव’ या कार्यक्रमात केले.
इंदिरानगर येथील संत ज्ञानेश्वर संकुलातील स्वर्णिमा सभागृहात पंडित राजाभाऊ देव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गायक राजाभाऊ देव यांचा जीवनपट गायन तसेच वेगवेगळ्या आठवणींतून उलगडून दाखविण्यात आला. यावेळी डॉ. अलका देव-मारूलकर यांनी देव यांचा ग्वाल्हेर, जयपूर तसेच किराणा गायकीच्या अभ्यासावर प्रकाशझोत टाकला, तसेच पिता आणि गुरुस्थानी असलेल्या नात्याच्या विविध आठवणींना उजाळा दिला. देव यांच्या जीवनात आलेले सुखद आणि कष्टदायक अनुभवही यावेळी मांडण्यात आले. पंडित राजाभाऊ देव यांची संगीतावर असलेली निष्ठा आणि ध्यास तसेच गुरुंबद्दलची असणारी श्रद्धा याबाबतच्या आठवणींना उजाळा देताना विविध प्रसंग सांगितले. ग्वाल्हेरला घेतलेले संगीत शिक्षण, संगीता क्षेत्रात येण्यासाठी वडिलांचा असलेला विरोध अशा विविध घटनांचा उल्लेख डॉ. अलका देव-मारूलकर यांनी यावेळी केला.
कार्यक्रमात या नंतर निनादिनी संस्थेच्या शिष्यांनी राग शुद्ध कल्याणमधील ‘सुन सखीरे बाजे’, मारू बिहाग रागातील ‘मुख निरख सावरियाँ’, राग देव गंधारमधील ‘मन मितवा मोरा’ ही बंदिश, नायकी कानडा रागातील ‘एरी मे को पिया बीन’, पुरिया कल्याण रागातील ‘मोरा मनवा लाजत है’,तसेच भूप रागातील ‘मानस सुध बाळी’ कोमल रिषभ रागातील ना मोहे अवरित, राग अभुगी कानडातील ‘जगत्पत सब सुख निधान’या रागांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी डॉ. अलका देव-मारूलकर आणि शिवानी मारूलकर-दसककर यांना निनादिनी संस्थेतील शिष्यांनी संगीत साथ दिली. यात शिवानी मारूलकर-दसककर, स्वराली पणशीकर, मुक्ता जाधव, अश्विनी भार्गवे, जयश्री राजेगावकर, प्राजक्ता पितळे, अमृता जाधव, रजिंदर कौर, गौरी दसककर, कल्याणी दसककर, ईश्वरी दसककर, प्रीतम नाकील, श्रीराम तत्त्ववादी यांचा समावेश
होता.
दरम्यान पंडित राजाभाऊ देव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)