विहिरीत पडलेल्या मोराचे वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:00+5:302021-05-25T04:15:00+5:30
एकलहरे : शेतकऱ्यांच्या समयसूचकतेने जीवदान सिन्नर : तालुक्यातील एकलहरे येथे पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या मोराचे शेतकऱ्यांच्या समयसूचकतेने प्राण वाचले. ...
एकलहरे : शेतकऱ्यांच्या समयसूचकतेने जीवदान
सिन्नर : तालुक्यातील एकलहरे येथे पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या मोराचे शेतकऱ्यांच्या समयसूचकतेने प्राण वाचले. त्यामुळे समाधान व्यक्त होत असून, शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे.
एकलहरे येथील रंगनाथ मुरलीधर घुले यांच्या विहिरीत सकाळी साडेनऊच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेला मोर पडलेला असल्याची घटना लक्षात आली. विहिरीपासून जवळच गणेश संपत घुले यांचे शेतात नांगरणीचे काम सुरू होते. याचदरम्यान विद्युतपंपाद्वारे पिकांना पाणी भरायचे असल्यामुळे रंगनाथ घुले पंप सुरू करण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना मोर पाण्यात पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लगेचच सुनील चांगदेव घुले, संतोष राजाराम घुले, गणेश घुले यांना मदतीसाठी बोलावून घेतले. मोराचे प्राण वाचवायचेच अशा विचाराने त्यांनी एका बाजेला दोर बांधून विहिरीत सोडली. मोर बाजेवर बसून बाज विहिरीबाहेर काढल्यास मोराचे प्राण वाचतील असा अंदाज त्यांनी बांधला. दोन-तीनदा मोर बाजेवर बसून कठड्यापर्यंत आला. मात्र जिवाच्या भीतीने पुन्हा विहिरीत झेपावला. बराच वेळाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मोराला सुरक्षित विहिरीबाहेर काढण्यात आले.
वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. कर्मचारी मधुकर शिंदे तेथे हजर झाले. शेतकऱ्यांनी मोराला सुरक्षित त्यांच्या हवाली केले. शिंदे यांनी वरिष्ठांच्या परवानगीने मोराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. तसेच शेतकऱ्यांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे कौतुक केले.
फोटो ओळी -
सिन्नर तालुक्यातील एकलहरे येथील शेतकऱ्यांनी मोराला विहिरीतून काढून जीवदान दिले.