मालेगावच्या ग्रामीण भागात जनजीवन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:19+5:302021-04-17T04:13:19+5:30
जळगाव निंबायती : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. सदर ...
जळगाव निंबायती : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. सदर संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 'मिशन ब्रेक द चेन' मोहीमेतंर्गत संचारबंदी लागू केल्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी, मालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी यापूर्वीच २५ मार्चपासूनच स्वयंस्फूर्तीने गावात कडकडीतपणे बंद पुकारले होते. त्याला ग्रामस्थांचे पूर्णपणे सहकार्य मिळाले होते. सद्यस्थितीत ग्रामपंचायती मार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कडकडीतपणे बंद पाळण्यात येत आहे. आरोग्य खात्याच्या सहकार्याने गावात आरोग्य सर्वेक्षण, कोरोना चाचणी, गावातच लसीकरण केंद्र, फवारणी, सॅनिटायझरचा वापर, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गृहविलगीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीसपाटील, तलाठी, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शहरी भागाप्रमाणे गावपातळीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करणे शक्य नसल्याने स्थानिक प्रशासनावरच सर्वस्वी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील कोरोनाची मोठी धास्ती घेऊन घरीच राहणे पसंत केले आहे. मात्र रोजंदारीने काम करणाऱ्या सामान्य व गरीब लोकांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. शेती व त्यासंबंधी उद्योगांना सूट असली तरी या दिवसात शेतीची जवळपास बहुतांश कामे आटोपलेली असतात. गावातील कापड दुकान, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, हार्डवेअर, सोनारचे दुकान, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, शिवणकाम, चांभारकाम, मोबाइल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स, रिक्षाचालक आदी व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने त्यांच्यावर आधारित लोकांची पुरती कोंडी झाली आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोट...
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नसल्याने गावातच सरकार सेवा केंद्र सुरू केले होते. या माध्यमातून आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करणे, विविध शासकीय दाखले ऑनलाइन काढणे, ऑनलाइन अर्ज भरणे आदी कामे केली जात होती. नागरिकांना गावातच सुविधा उपलब्ध होती. मात्र मिनी लाॅकडाऊनमुळे सेवा केंद्र बंद असल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- युवराज आहेर, जळगाव निंबायती
कोट...
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत मी नोकरीला आहे. वर्षभर शाळा बंद असल्यामुळे पगार मिळाला नाही. म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुलांच्या खासगी शिकवणीचे वर्ग घेऊन गावातच रोजगार उपलब्ध केला होता. मात्र शासनाने लावलेल्या टाळेबंदीमुळे मुलांकडे क्लासची फी अडकली असून, पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आहे.
- सिद्धार्थ अहिरे, चोंडी