राजापूर परिसरातील पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:00 AM2021-07-11T00:00:24+5:302021-07-11T00:00:54+5:30
राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला ...
राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला होता. पिके पाण्यावाचून सुकू लागली असताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा तरारली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
राजापूर व परिसरात उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी पेरओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. परंतु शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतित होता. पेरणी केली पण काही ठिकाणी कोंभ वर आलेच नव्हते. खरिपात शेतकऱ्यांनी मका, भुईमूग, बाजरी, तूर अशी पिके घेतली आहेत. राजापूर व परिसरात दोन टप्प्यांत पेरण्या झाल्या आहेत. आता काही ठिकाणी मका मोठा झाला आहे तर काही मक्याला आताच कोंब फुटत आहे. आजही विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी वर्ग लाल कांदा उळे टाकण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. त्यात आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा औषधे फवारणी केली जात आहे.
राजापूर येथे बऱ्याच पेरण्यांमध्ये तीन आठवड्यांचा फरक आहे. अगोदरच्या पिकांची दोनदा कोळपणी झाली आहे. तर नंतर पेरणी केलेली पिके हे आता उतरत आहेत. काही शेतकऱ्यांनी काळपट जमीन असलेल्या शेतात सोयाबीन पेरणी केली, परंतु पुरेशी पेरओलअभावी दुबार पेरणी करावी लागली आहे. अगोदर पेरणी केलेल्या पिकांना आता पाऊस झाल्याने युरिया खताची मात्रा देणे सुरू असून बऱ्याच शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने त्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी युरिया खताची टंचाई निर्माण होते की केली जाते याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
विहिरींनी अजूनही तळ गाठलेला आहे. आता थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना या नक्षत्राने जीवदान दिले आहे. येथून मागे दोन दिवसांपूर्वी पिकांची परिस्थिती बिकट झाली होती. सध्या महागाई भरमसाठ वाढली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत; परंतु यात जे शेतकरी थकीत राहतात त्यांना कर्जमाफी दिली जाते. व जे शेतकरी थकीत न राहता कर्ज वेळेवर भरतात त्यांना कर्जमाफी नाही ही शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दोन लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ केले असते तर उर्वरित दोन लाखांवरील शेतकऱ्यांनी भरून दिले असते, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.
शेतकरी वर्ग हा नेहमी आशावादी राहून शेतीकामात व्यस्त असतो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाही. वेळेवर पाऊस नाही अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जीवनात येतात. तरीही शेतकरी न डगमगता संकटांना सामोरे जातो. शेतकऱ्यांवर पेरणीपासून ते पीक येईपर्यंत अनेक संकटे येतात. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष केंद्रित करावे.
- साखरचंद घुगे, शेतकरी, राजापूर