सिडकोतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:32+5:302021-05-18T04:15:32+5:30
नाशिक महानगरात कोरोनाने हाहाकार माजवला आणि बेड मिळविण्यासाठी रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांची भटकंती सुरू झाली. तेव्हा शिवसेना महानगरप्रमुख ...
नाशिक महानगरात कोरोनाने हाहाकार माजवला आणि बेड मिळविण्यासाठी रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांची भटकंती सुरू झाली. तेव्हा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सिडकोत सावतानगर येथे ६५ बेडचे कोविड केअर सेंटर अल्पावधीतच साकारले. त्यातील ४४ बेड्स ऑक्सिजनचे आहेत. आतापर्यंत ११० रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाले. पैकी ५६ रुग्ण आत्तापर्यंत ठणठणीतरीत्या बरे झाले. विशेष म्हणजे, येथील सर्व सेवा नि:शुल्क असून, रुग्णांच्या दोन वेळेचे जेवण, चहा आणि नाश्त्याची व्यवस्थाही केली जाते. या सर्व व्यवस्थेवर सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, दीपक बडगुजर, संजय भामरे, पंकज जाधव, नितीन परदेशी, अविनाश काकडे, विजय सोनवणे, गणेश तिडके, बापू भालेराव हेही सातत्याने रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.
चौकट===
वैद्यकीय अधिकारी भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर डॉ.किरण बिरारी, डॉ.संदीप मंडलेचा, डॉ.गायत्री बोरसे, डॉ. राहुल मटाले, डॉ.प्रिया चोपडा, डॉ.विशाल सोनवणे या डॉक्टर बरोबर नर्स, वार्डबॉय, मावशी असा एकूण २५ जणांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी कार्यरत आहे.
-------------
रुग्णांना दिलासा देणारे संभाजी स्टेडियम कोविड सेंटर
मनपा प्रभाग क्रमांक २९चे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या संकल्पनेतून राजे संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, या ठिकाणी आजपर्यंत पाचशेहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. या ठिकाणी ९०च्या वर ऑक्सिजन लेवल असलेल्या रुग्णांची सोय केलेली असताना, कमी ऑक्सिजन व गंभीर परिस्थिती असलेले रुग्ण आल्यावर त्यांची लगेच मनपाच्या बिटको, तसेच झाकीर हुसेन रुग्णालयात व्यवस्था करून दिल्याचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितले. या ठिकाणी १८० बेड विलगीकरणासाठी तर २० बेड ऑक्सिजनचे असे दोनशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.