एकेका ॲम्फोटेरेसिनसाठी जीवघेणी झुंज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:43+5:302021-05-21T04:16:43+5:30
नाशिक : कोराेनापेक्षाही भयावह ठरत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर परिणामकारक ठरणाऱ्या अम्फोटेरेसिन इंजेक्शन मिळवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी नागरिकांना ...
नाशिक : कोराेनापेक्षाही भयावह ठरत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर परिणामकारक ठरणाऱ्या अम्फोटेरेसिन इंजेक्शन मिळवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी नागरिकांना अक्षरश: ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. दुपारनंतर जिल्हा रुग्णालयास केवळ १४० इंजेक्शन्स प्राप्त झाले असताना ते घेण्यासाठी अक्षरश: दोनशेहून अधिक नागरिक रांगेत उभे होते. प्रत्येक रुग्णाला दिवसामागे किमान ६ ते ८ इंजेक्शन्सची गरज असताना जिल्हा प्रशासनाकडून केवळ प्रारंभीच्या ३५ नागरिकांना इंजेक्शन्स देऊन वाटप थांबल्याने संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला.
नाशिक विभागाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या ७३० इंजेक्शन्समधून नाशिक जिल्ह्याला अवघे १४० इंजेक्शन्स प्राप्त झाली होती. रांगेतच दोनशेहून अधिक नागरिक असताना आणि प्रत्येकाला किमान सहा ते आठ इंजेक्शन्सची गरज असताना जिल्हा रुग्णालयाकडून प्रत्येकाला केवळ ४ इंजेक्शन्स दिले जात होते. अशा गोंधळाच्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टर्सकडून काही इंजेक्शन्स मागल्या दाराने दिली जात असल्याचा आरोपदेखील काही नागरिकांनी केला. मागच्या बाजूने इंजेक्शन्स घेण्यासाठी आलेल्यांवर उपस्थित अन्य नागरिकांनीदेखील आक्षेप घेतला. तसेच कॅमेरा दिसताच ते सैरावैरा पळून गेल्यानंतरच हा मागील बाजूने वाटपाचा प्रकार बंद झाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
इन्फो
वाटप कसे ठरवायचे त्याबाबतही संभ्रम
विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाला नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांसाठी प्राप्त झालेल्या ७३० इंजेक्शन्सचे वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये कसे करायचे, त्याबाबतदेखील संभ्रम आहे. त्यात ५ जिल्ह्यांना समान वाटप की जिथे रुग्ण अधिक तिथे अधिक वाटप हा निकषदेखील निश्चित नसल्याने प्रशासनाचाही गोंधळ उडत आहे. त्यात मायको म्युकोसिसग्रस्त सर्व रुग्णांची नोंददेखील कोणत्याही जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने रुग्णसंख्येचा निकषही फोल ठरत असल्याने या इंजेक्शन्सच्या वाटपाचा प्रचंड घोळ सुरु आहे.
इन्फो
नियोजनात वारंवार बदल
इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्ण जिथे दाखल असेल तेथील हॉस्पिटलचे लेटर, तसेच हॉस्पिटलला रक्कम भरुन त्यांच्याकडून चार इंजेक्शन्सच्या रकमेचा चेक घेऊन येणाऱ्यांना ते इंजेक्शन देण्याची प्रक्रीया आधी सांगण्यात आली. त्यानंतर गुरुवारी ही सर्व कागदपत्रे घेऊन गेलेल्या नागरिकांना यासाठी स्वतंत्र मेलआयडी तयार केला जाणार असून त्यावर हे कागदपत्र पाठवावेत, त्यानंतर त्याला मंजुरी देऊन इंजेक्शन्स दिले जातील, असे सांगण्यात आले. त्यानंतर अचानकपणे दुपारनंतर ओपीडीमध्ये रांग लावण्यास सांगून निर्धारीत रक्कम देणाऱ्यांना इंजेक्शन्स देणार असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे आधी एक नियोजन, नंतर त्यात बदल, पुन्हा अचानक रांगा लावण्यास सांगून उपस्थित असतील त्यांना वाटप असे बदल करण्यात आल्यानेदेखील नागरिक संतप्त झाले होते.
कोट
आजपासून रेमडेसिविरप्रमाणे थेट रुग्णालयांना वाटप
जिल्हा रुग्णालयातून बुधवारी ६० तर गुरुवारी १४० इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले. निर्धारीत नियमानुसार प्रत्येकाला ४ इंजेक्शन्स देण्यात आली. त्यामुळे इंजेक्शन संपल्यानंतर अन्य नागरिक नाराज झाले. त्यामुळे आता शुक्रवारपासून सर्व इंजेक्शन्सचे वाटप हे रेमडेसिविरप्रमाणे हॉस्पिटल्सच्या मागणीनुसार प्रथम मेल करणाऱ्यांना प्राधान्य या तत्वावर आणि उपलब्ध संख्येनिहाय देण्यात येणार आहेत.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक