जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 10:26 PM2016-07-10T22:26:25+5:302016-07-10T22:30:30+5:30
बळीराजा आनंदला : बंधाऱ्यांच्या पातळीत वाढ; संततधार कायम
नाशिक : बागलाणसह त्र्यंबकेश्वर व सुरगाणा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी जनजीवन विस्कळीत झाले होते.
सटाणा शहर व तालुक्यात बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, खरिपाच्या पेरणीला आता वेग येणार आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाण्याच्या पातळीत चांगल्यापैकी वाढ होत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
बागलाण तालुक्यात यंदाच्या हंगामात
मृगाच्या अखेरच्या दिवशी बरसलेल्या चाळीस मिनिटांच्या पावसानंतर आज दुसऱ्यांदा पावसाला सुरुवात झाली. तब्बल चाळीस दिवस ऊन-सावलीच्या खेळामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता.
सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. थोडीफार पुंजी शिल्लक होती तिही यंदा खरिपाच्या मशागतीला आणि बियाणे व खताच्या खरेदीसाठी खर्ची पडली होती. मात्र पावसाचा मागमूसही दिसत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.
मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, ब्राह्मणपाडा, द्याने, नामपूर, राजपूर पांडे, उत्राणे, अंबासन तसेच काटवन परिसरातील चिराई, राहूड, बिलपुरी, टेंभे, इजमाणे, श्रीपूरवडे, नांदीन, दरेगाव, दसवेल, पिंपळकोठे, भडाणे व करंजाडी खोऱ्यातील मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, लादुद, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, वीरगाव, डांगसौंदाणे, निकवेल, दसाणे, केरसाणे, ब्राह्मणगाव, लखमापूर, अजमीर सौंदाणे, आराई, शेमळी, देवळाणे आदि भागात सायंकाळपर्यंत संततधार सुरूच होती. पावसामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. (लोकमत चमू)