क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून जीवघेणी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:57 PM2020-02-07T16:57:07+5:302020-02-07T16:57:24+5:30
दिंडोरी तालुका : पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून जीवघेणी वाहतूक केली जात आहे. पोलीस यंत्रणेचे मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
पिंपळगाव-वणी ते सापुतारा ह्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याने पायी चालणेसुद्धा कसरतीचे बनले आहे. अशा स्थितीत खासगी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचा भंग केला जात आहे. वणी परिसरातील पिंपळगाव, पोरगाव, मुळाणे, बोरगाव, दहिवी, सुरगाणा, भनवड अशा भागात परिवहन मंडळाची बससेवा कमी असल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो; परंतु खासगी वाहनचालकांकडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. याशिवाय, चालक ांकडून मोबाइलवर बोलत वाहन चालविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. मागील महिन्यात मेशी फाट्यावर बस-रिक्षा अपघातात २६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मालेगाव व देवळा तालुक्यात अवैधरीत्या प्रवासी वाहतुकीवर वाहतूक विभागाने कार्यवाही केली होती. तशीच कारवाई दिंडोरी तालुक्यातही करावी तसेच परिसरात परिवहन महामंडळाने मिनी बसेस चालवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.