धोकादायक पुलावरून जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:06 PM2020-04-09T22:06:09+5:302020-04-09T23:18:56+5:30
खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे.
खेडलेझुंगे : येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे.
मागील अवकाळी पावसामध्ये निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवरील गावाच्या बाजूच्या (पुलाच्या उत्तर बाजूचा) पुलाचा भराव वाहून गेलेला होता. या पुलावरून परिसरातील विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार वर्ग नाशिक, लासलगाव, सिन्नर, नगर, पुण्यासह परिसरातील गावांमधून नियमित ये-जा करीत असतात. परंतु पुलाच्या उत्तरेकडील भाग वाहून गेल्याने तेथील वाहतुक पावसाळ्यात बंद करण्यात आलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाचा जोर कमी होताच तेथे तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकून वाहतुक सुरळीत करुन दिलेली होती.
मागील काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पुलाचे पक्के काम सुरू झालेले आहे, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मजूर कामावर येत नसल्याने सध्या ते काम बंद आहे.
या पुलावरून मोठ्या वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक होत होती. सध्या मोठ्या वाहनांसह इतर सर्व वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक, शेतकरी हे याच मोठ्या पुलाजवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यावरील अरुंद (अंदाजे रुंदी १५ फूट) पुलाचा वापर शेतकरी व परिसरातील छोटे वाहनधारक करीत आहेत. शेती कामासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात.
यापूर्वी लोखंडी अँगलमधून लोखंडी सळ्या टाकून संरक्षक कठडा होता, परंतु आज रोजी पुलावर लोखंडी सळ्याच नाही तर लोखंडी अँगलही नाहीत. सदरचे अँगल पक्क्या बांधकामात गाडलेले असतानाही कुठे लुप्त झाले हा येथील नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे.
चाकरमान्याची गैरसोय...
मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या याच पुलावरून येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग, नगर, पुणे, सिन्नर, नाशिक, लासलगाव येथे कामानिमित्त, शेतमाल विक्रीसाठी नियमित ये-जा करीत आहे, परंतु या धरणावर संरक्षक कठडाच नसल्याने जीव मुठीत धरून येथून वावर करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथून ये-जा करणारे विद्यार्थी, शेतमजूर, रहिवासी यांच्या जीवितास धोका निर्माण होेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहे.
पाटबंधारे विभागाचे वरातीमागून घोडे....
विशेष म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक सार्वजनिक पाटबंधारे विभागाने लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्यापासून जर वाचवायचे असेल तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरातीमागून घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने लक्ष देत पुलावर संरक्षण उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
केटीवेअर बंधाºयाच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झालेला आहे. तसेच याच पुलाच्या दक्षिण बाजूने मागील पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे जमीन ढासळलेली आहे. सदर मोठ्या पुलावरील वाहतूक याच मार्गाने होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षक कठाडा नसल्यामुळे यापुर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नाही़