विद्यार्थिनींसाठी जीवनदायिनी ‘अटल आरोग्य वाहिनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:47 AM2020-02-22T00:47:58+5:302020-02-22T01:13:24+5:30
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी योजना कळवण तालुक्यातील १५ वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या नववीतील विद्यार्थिनीस जीवनदायिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीच्या हृदयावर मुंबईच्या केइएम रुग्णालयात गुरुवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे.
नाशिक : आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी योजना कळवण तालुक्यातील १५ वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या नववीतील विद्यार्थिनीस जीवनदायिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीच्या हृदयावर मुंबईच्या केइएम रुग्णालयात गुरुवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे.
कळवण तालुक्यातील गोपाळखडी येथील शासकीय आश्रमशाळेत दीड वर्षांपूर्वी अटल आरोग्य वाहिनीमार्फत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत इयत्ता नववीतील चंद्रभागा चौरे या विद्यार्थिनीस हृदयाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तवाहिनी दाबली असल्याचे आढळून आले. त्यामुळे हृदयास पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता. यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चंद्रभागाला जिल्ह्णातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समजल्यानंतर तिच्या पालकांना भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी उपचारास तयारी दर्शविली नाही. अटल वाहिनीच्या डॉक्टरांनी तिच्या पालकांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २६ डिसेंबर रोजी मुंबईतील केइएम रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली. आजाराचे निदान झाल्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी तिची अॅँजिओग्राफी करण्यात आली. मात्र तिचे वय अवघे १५ वर्षे असल्याने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. मात्र केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता चंद्रभागाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दाबल्या गेलेल्या रक्तवाहिनीत स्टेन टाकण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिला श्वास घेण्यास कोणताही अडथळा येत नाही. तिची प्रकृतीही स्थिर आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येणाºया निधीतून करण्यात आला. उपचारासाठी एकूण दोन लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात आला.
गणित शिक्षकाची रुग्णालयात सोबत
गोपाळखडी आश्रम शाळेतील गणित विषयाचे शिक्षक रोशन शेळके यांची चंद्रभागाला उपचारादरम्यान चांगली मदत झाली. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या घरातून रुग्णालयापर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. रुग्णालयात १५ दिवस ते तिच्यासोबत होते. यादरम्यान त्यांनी विविध जबाबदाºया पार पाडल्या. तिच्या आईवडिलांनाही त्यांची मदत झाली.