जीवनरक्षकांना भासतेय सुरक्षेची गरज
By admin | Published: July 1, 2017 12:07 AM2017-07-01T00:07:03+5:302017-07-01T00:07:19+5:30
नाशिक : डॉक्टर हे आपल्या क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असतात. अशावेळी त्यांना त्यांचे कर्तव्य करू देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले केले जातात.
नामदेव भोर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डॉक्टर हे आपल्या क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असतात. अशावेळी त्यांना त्यांचे कर्तव्य करू देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले केले जातात. त्यात अनेकदा जीवही गमवावा लागत असल्याने या जनसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन:पुन्हा ऐरणीवर येत असून, जनमानसाच्या जीवनाची सुरक्षा करणाऱ्या या जीवन रक्षकांनाच आता सुरक्षेची गरज निर्माण झाली आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहण म्हामूनकर यांना रु ग्णांच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याने म्हामूनकर यांचा एक डोळा निकामी झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे, तर दुसरीकडे नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलेला स्वाइन फ्लूचा रुग्ण दगावल्याने त्याच्या संतप्त झालेल्या नातलगांनी कक्षातील इंटर्न डॉक्टर रोहित पाटील व परिचारिका चारु शीला इंगळे यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याचा प्रकार घडला. यानंतर झालेल्या आंदोलनांमुळे सरकारने तत्काळ अनेक निर्णय घेतले. परंतु विषयाची तीव्रता कमी होताच, बरेच निर्णय कागदावरच राहीले. डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले व मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर असोसिएशनतर्फे काळ्या फिती लावून निषेध, आंदोलने व मूकमोर्चे काढले जातात आणि रु ग्णांच्या नातलगांकडून होणाऱ्या नाहक मारहाणीबद्दल डॉक्टर मंडळींकडून आक्रोश व्यक्त करण्यात येतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांनी गळ्यात बंदुका लटकवून रु ग्णांची तपासणी करावी का असा प्रश्न आता डॉक्टर शासनाला विचारत असून, डॉक्टरांना यापुढे २४ तास संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
रुग्णांचा विश्वास जिंकण्याची गरज
४भारतामध्ये डॉक्टर आणि रु ग्ण यांचे प्रमाण १:१००० एवढे आहे. त्यामुळे डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या पाहणीत ७५ टक्के हल्ले रु ग्णालयात कामावर असताना झाल्याचे आढळून आले आहे. तसेच बहुतेक हल्ले सरकारी रु ग्णालयात झाल्याचेही निदर्शनास आले आहे. पूर्वी डॉक्टर व रु ग्ण यांच्यात विश्वासाचे नाते होते. डॉक्टरांकडून उपचार मिळाल्याबद्दल कृतज्ञतेची भावना होती. मात्र ते आता कमी होत असल्याने डॉक्टरांनीही रुग्णांचा विश्वास जिंकण्याची गरज आहे.
स्नेहपूर्ण, पारदर्शी संवाद आवश्यक
डॉक्टर नेहमीच रुग्णांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात. परंतु काही प्रक रणांमध्ये डॉक्टरांनाही मर्यादा येतात. अशावेळी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. कठोर कायद्याची भीती ही हवीच, पण केवळ कठोर कायद्यामुळेच डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना कमी होतील अशा भ्रमातून सर्वप्रथम बाहेर येऊन त्यावरील अन्य उपाययोजना शोधायला हव्यात. यासाठी सरकार- रु ग्णालयीन प्रशासन-डॉक्टर यांचे परस्परांशी आणि त्यांचे विशेषत: रु ग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे रु ग्णांशी व त्यांच्या नातलगांशी आपुलकीचा, स्नेहभावाचा आणि पारदर्शी संवाद होणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांनी अत्यावस्थ रुग्णांना तत्काळ वैद्यकीय साहाय्य करीत रुग्णाच्या प्रकृतीची व उपचारपद्धतीची रुग्णाच्या नातेवाइकांना माहिती देणे गरजेचे आहे.
- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ