मित्राचा खून करून मृतदेह टाकीत फेकणाऱ्यांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 07:31 PM2019-12-17T19:31:39+5:302019-12-17T19:34:01+5:30
विवेकचा गळा आवळल्यानंतर चाकूने सपासप वार करून रितेश, दीपक यांनी ठार मारले. यानंतर मयत विवेकचा मृतदेह त्यांनी एका बेडशिटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला.
नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढत आपल्या मित्राला मद्य पाजून गळा आवळून चाकूने भोसकून खून केल्याची घटना २०१५ साली नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. गुन्ह्यातील आरोपी रितेश उर्फ राजन जनाजी भालेराव (२१), दीपक छगनराव जाधव (२२) याच्यावर त्याचा मित्र विवेक देवीदास पगारे याचा खून केल्याचा आरोप जिल्हा न्यायालयात सिद्ध झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी भालेराव व जाधव या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
देवळालीगावात राहणारे भालेराव, जाधव या दोघांनी जुन्या वादाची कुरापत काढण्यासाठी १३ फेब्रुवारी २०१५ रोजी रात्री रितेश याने विवेकला दारू पिण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घरी आणले. मद्यसेवन केल्यानंतर आरोपी रितेश आणि दीपक या दोघांनी मिळून विवेकचा गळा आवळला. त्यानंतर चाकूने भोसकून त्याचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आरोपी भालेराव, जाधव व संशयित राहुल भालेराव या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नाशिकरोड पोलिसांनी दाखल केला. पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. खुनाच्या गुन्ह्याचे परिस्थितीजन्य पुरावे गोळा केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र पोलिसांनी सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. सरकारी पक्षाच्या वतीनेअॅड. शिरीष जी. कडवे यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी २१ साक्षीदार तपासले. साक्षीदरम्यान एकही साक्षीदार फितूर न झाल्याने आरोपींविरोधात ठोस पुरावे सिद्ध झाले. विवेक व रितेशला शेवटचे सोबत पाहिल्याचा पुरावा यावेळी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे न्यायालयाने रितेश भालेराव आणि दीपक जाधव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर ठोस पुरावे नसल्याने राहुल भालेराव याची निर्दोष मुक्तता केली.
मृतदेह शौचालयाच्या टाकीत
विवेकचा गळा आवळल्यानंतर चाकूने सपासप वार करून रितेश, दीपक यांनी ठार मारले. यानंतर मयत विवेकचा मृतदेह त्यांनी एका बेडशिटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला. परिसरातील एका सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टाकीत मृतदेह पोत्यासह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.