मळगाव बंधाऱ्यातील गाळाचा उपसा

By admin | Published: December 31, 2015 10:20 PM2015-12-31T22:20:39+5:302015-12-31T22:27:40+5:30

सटाणा : परिसर होणार टॅँकरमुक्त; रब्बीला आधार; साठवले साडेचार दलघफू पाणी

Lift up the mud of the Malgaon harbor | मळगाव बंधाऱ्यातील गाळाचा उपसा

मळगाव बंधाऱ्यातील गाळाचा उपसा

Next

सटाणा : शहरासाठी पाणीटंचाई तशी पाचवीला पुजलेलीच. डिसेंबरपासूनच प्रशासनाला टंचाई निवारणासाठी कसरत करावी लागते. त्यातच नववसाहत भागातील पाण्यासाठीची ओरड यावर पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे यांनी पुढाकार घेत शहरालगत असलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ लोकसहभागातून उपसण्याचे काम केले. साडेपाच लाख रुपये खर्चून सुमारे वीस हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला. यामुळे बंधाऱ्यात तब्बल साडेचार दलघफू पाणी साठून भूजल पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना या पाण्याचा आधार तर मिळालाच; परंतु शहरातील सुमारे साडेसहाशे खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन संपूर्ण परिसर ‘जलयुक्त’ होण्यास मदत झाली आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या पाणीपुरवठा योजना तुटपुंज्या ठरत आहेत. त्यातच नद्यानाल्यांना गेल्या सात ते आठ वर्षात पूर न गेल्यामुळे भूजलपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, पालिका प्रशासनाच्या विहिरी, शहरातील खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरी ठप्प झाल्या आहेत. परिणामी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत असते. डिसेंबर सुरू झाला की टॅँकर सुरू असे समीकरण ठरलेलेच. यावर मात करण्यासाठी शासन अथवा पालिका प्रशासनावर विसंबून न राहता पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे, प्रदीप उखा सोनवणे यांनी जलसुरक्षित करण्याचा निर्धार केला. त्यांनी पुढाकार घेऊन आरम नदीवर बांधलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ उपसण्याबरोबरच शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी लोकसहभागाची संकल्पना पुढे आणली आणि त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन जेसीबी आणि वीस ट्रॅक्टरने पंधरा दिवस गाळ उपसण्याचे काम करून वीस हजार मेट्रिक टन गाळ काढला. तसेच नदी पात्राचे खोली वाढवून रुंदीकरण करण्यात आले. यामुळे या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक झाल्यामुळे सटाण्याची जलश्रीमंती दुष्काळी गावासाठी नक्कीच प्रेरक ठरेल.

Web Title: Lift up the mud of the Malgaon harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.