३५० अंध थेरपिस्टला हवा आधाराचा उजेड
By संजय वाघ | Published: September 8, 2018 01:22 AM2018-09-08T01:22:37+5:302018-09-08T01:27:56+5:30
जन्मजात अंधत्व वाट्याला येऊनही त्याबद्दल कुढत न बसता अनेक दृष्टीबाधितांनी आपल्या ज्ञानाच्या अंतश्चक्षूंच्या साहाय्याने डोळसांना लाजविणारे काम उभे केले आहे. आजही देशभरातील ३५० दिव्यांग फिजिओथेरपिस्ट निसर्गोपचार थेरपीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा बजावित असून, सामाजिक आधाराच्या प्रकाशापासून ते आजही वंचित आहेत.
नाशिक : जन्मजात अंधत्व वाट्याला येऊनही त्याबद्दल कुढत न बसता अनेक दृष्टीबाधितांनी आपल्या ज्ञानाच्या अंतश्चक्षूंच्या साहाय्याने डोळसांना लाजविणारे काम उभे केले आहे. आजही देशभरातील ३५० दिव्यांग फिजिओथेरपिस्ट निसर्गोपचार थेरपीच्या माध्यमातून रुग्णांची सेवा बजावित असून, सामाजिक आधाराच्या प्रकाशापासून ते आजही वंचित आहेत.
धकाधकीच्या आयुष्यामुळे जीवनशैली बदलल्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब व अपंगत्व आदी नानाविध विकारांनी मनुष्य त्रस्त आहेत. त्या आजारांवर मात करण्यासाठी आधुनिक उपचार पद्धती विकसित होत असताना फिजिओथेरपी पद्धतीनेही रुग्णांना आधार दिला आहे. अंध थेरपिस्ट बालपणापासून ब्रेललिपीतून शिक्षण घेतात, त्यांना उत्तम स्पर्शज्ञान असते. रुग्णांच्या सांध्याची हालचाल व स्नायू पकडून त्यावर उपचार करण्यासाठी या स्पर्शज्ञानाचा त्यांना लाभ होतो.
फिजिओथेरपिस्टसंदर्भात देशात तीन संस्था कार्यरत असून, त्यात अहमदाबाद येथील ब्लाइंड पीपल्स असोसिएशन, नवरंगपुरा फिजिओथेरपी आणि मुंबईतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थांचा समावेश आहे. आज देशात ३५० दृष्टिबाधित थेरपिस्ट सेवा बजावित असून, त्यातील केवळ ३१ जण पदवीधर आहेत. त्यांना वैद्यकीय सेवा बजावताना विविध अडचणींना सामारे जावे लागते. ती अडचण दूर व्हावी यासाठी केंद्र शासनाने कौन्सिल बनवून त्यांचेही रजिस्ट्रेशन करून घ्यावे यासाठी त्यांचा लढा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, अद्याप त्यात यश आलेले नाही.
फिजिओथेरपींसंदर्भात समाजात जागृती व्हावी व त्यांनाही मान्यता मिळावी यासाठी साजऱ्या केल्या जाणाºया जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या अनुषंगाने शासन व समाजाने या घटकाला आधार द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.