विल्होळीकर आंदोलनाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:08 PM2018-10-02T18:08:04+5:302018-10-02T18:08:24+5:30
महामार्गावर सुमन हॉटेलसमोर धोकादायक वळण असल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात, त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच अंबडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी
विल्होळी : मुंबई महामार्गावरील हॉटेल सुमनच्या समोरील धोकादायक वळणावर सातत्याने होणारे अपघात पाहता याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा कोणत्याही क्षणी ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा देणारे निवेदन विल्होळी ग्रामपंचायत व संस्कृती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर सुमन हॉटेलसमोर धोकादायक वळण असल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात, त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच अंबडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी हॉलीडे कॉटेजजवळ क्रॉसिंग ठेवण्यात आलेली असून, सदर ठिकाणी वाहनांचा वेग जोरात असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना बऱ्याच वेळा अपघात होऊन अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. या ठिकाणी वाहतूक बेटामुळे व झाडांमुळे रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहतूक बेटाचा आकार कमी करून त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात यावे, तसेच वाहनधारकांना रात्रीच्या वेळी रस्ता दुभाजक व गतिरोधक लक्षात येण्यासाठी रस्त्यावर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जानेवारी महिन्यात ग्रामसभेने ठराव करून त्याची प्रतही दिलेली आहे. परंतु त्याची अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत ग्रामसभेच्या मागण्यांची दखल न घेतल्यास ग्रामस्थांकडून ऐनवेळी कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.