‘अथर्वशीर्षात गणेशाचे प्रकाशात्मक स्वरूप’
By admin | Published: January 22, 2015 12:57 AM2015-01-22T00:57:47+5:302015-01-22T00:57:57+5:30
‘अथर्वशीर्षात गणेशाचे प्रकाशात्मक स्वरूप’
पंचवटी : श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. श्रीगणेशाचे स्वरूप प्रकाशात्मक असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा युवा संत डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.
पंचवटीतील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर येथील दत्तमंदिर प्रांगणात मानव कल्याण मिशनतर्फे चारदिवसीय श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, सृष्टीचे बीज ओमकारातून निर्माण झाले आहे. त्यामुळे या ओमकाराच्या मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. श्रद्धा अंध नसते. त्यामुळे ती अंधश्रद्धा होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. मनावर आघात होऊ नये यासाठी अथर्वशीर्ष उपयुक्त आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचे सार श्रीगणपती अथर्वशीर्षात आहे. वड ज्ञानाचे, औदुंबर भगवान शिवाचे, पिंपळ भगवान विष्णूचे प्रतीक असून, याला त्रिवेणी म्हणतात. या त्रिवेणीची संस्कृती जोपासण्याचे काम संत साहित्य करत आहे. अनुभव सांगता येतात परंतु अनुभूती सांगता येत नाही. वातावरण प्रसन्न बनविण्यासाठी शंखध्वनी, घंटी आवाजाचा उपयोग होतो, याच्या पाठीमागेदेखील विज्ञान असल्याचे डॉ. गुट्टे म्हणाले. यावेळी सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले.
या कार्यक्रमास वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, नगरसेवक रुची कुंभारकर, रमेश वानखडे, मोहन सहाणे, मुकुंद क्षीरसागर, दिलीप अहिरे, दत्तात्रय बच्छाव, एकनाथ पगार, प्रभाकर दिंडोलकर, माणिक गुट्टे, भीमराव बोडके, अनिल सांगळे, किरण दराडे , ज्ञानेश्वर सोमासे, विलास कारेगावकर, राम अहेर यांच्यासह भाविक उपस्थित होते. प्रास्ताविक सोमनाथ बोडके यांनी केले. श्याम पिंपरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)