भीम गीतांच्या सादरीकरणाने मंदिर सत्याग्रहाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:27 AM2022-03-03T01:27:55+5:302022-03-03T01:28:14+5:30
काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने गोदाघाटावर आयोजित अभिवादन कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मंदिर सत्याग्रह आंदोलनाला उजाळा मिळाला. यावेळी भीमगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण गोदाकाठ परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमला.
नाशिक : काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने गोदाघाटावर आयोजित अभिवादन कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मंदिर सत्याग्रह आंदोलनाला उजाळा मिळाला. यावेळी भीमगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण गोदाकाठ परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमला.
२ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या काळाराम मंदिर सत्याग्रह आंदोलनाला ९२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदाघाटावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा घेण्यात आली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष किशोर घाटे होते. व्यासपीठावर नगरसेवक प्रियंका घाटे, भगवान दोंदे, अर्जुन रिपोर्टे, दामोदर जगताप, मिलिंद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गायिका मेघा मुसळे, संतोष जोंधळे यांनी भीम गीते सादर केली.
यावेळी कोरोना योद्धा म्हणून काम केलेले डॉक्टर्स, नर्सिंग, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, कवी, गायक, बौद्धाचार्य, शेतकरी, अंत्यविधी दाहक मित्र, मेडिकल, सामाजिक कार्यकर्ते आणि झोपडपट्टी सहकारी यांचा सत्कार करण्यात आला.
---------------------------------------
अभिवादन सभेत गायकांनी वाढविली रंगत
नाशिक : काळाराम मंदिर भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने गोदाघाटावर आयोजित कार्यक्रमात भीम गीतांच्या सादरीकरणाने अभिवादन कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भय्यासाहेब इंदिसे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री शोभा बच्छाव माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, अण्णासाहेब कटारे, आदी मान्यवर उपस्थित हाेते.
गायक कलावंत अनिरुद्ध बनकर यांनी सादर केलेल्या भीम गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. अभिवादन सभेचे नियोजित लक्ष्मीबाई ताठे, आदेश पगारे, प्रकाश पगारे यांनी केले होते. कार्यक्रमास शहर परिसरातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.