उत्सवासाठी अल्पदरात वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:35 AM2018-09-12T01:35:48+5:302018-09-12T01:35:57+5:30
महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
नाशिकरोड : महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
नाशिक शहरात गणेश उत्सवाााठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आतापर्यंत जवळपास १०० गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५५ मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यात आली आहे. नाशिक शहर विभाग एक अंतर्गत ४० तर नाशिक शहर विभाग दोन अंतर्गत २५ मंडळांचा त्यात समावेश आहे.
सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या वीज यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
गणेशोत्सवासाठी तात्पुरती व्यवस्था
गणेशोत्सवासाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अधिक वहन कर १ रुपये १८ पैसे असे एकूण ४ रुपये ३८ पैसे प्रति युनिट या अल्प दराने तात्पुरती वीज जोडणी महावितरणकडून दिली जात आहे. सर्व उपविभागीय कार्यालय व स्थानिक शाखा कार्यालयांना तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
अपघात विरहीत उत्सवासाठी गणेश मंडळांनी मंडप व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या व विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याची खबरदारी घ्यावी. अनाधिकृत वीज वापरामुळे घडणाºया अनुचित घटनेस संबंधीत गणेश मंडळ व अनाधिकृत वीज पुरवठा देणारा ग्राहक जबाबदार राहाणार आहे. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांनी सुरक्षितेच्या दृष्टीने अधिकृत वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे.