उद्योजक मल्लिकार्जुन उमडींच्या छंदाचे लिम्का बुकने केले कौतुक विमानातील नियतकालिकांचा अजब संग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:35 AM2017-08-02T00:35:00+5:302017-08-02T00:35:17+5:30
देश-विदेशातील विमान प्रवासात पाणी, खाद्यपदार्थ, ब्लॅँकेट आदींबरोबरच दिल्या जाणाºया नियतकालिकांची दखल कुणी फारशी घेत नाही. बहुतांशी लोक काही क्षण ते चाळतात आणि बाजूला ठेवून देतात. पण मुळातच वाचनाची आणि ज्ञान वाढविण्याची आवड असणारे नाशिकचे उद्योजक मल्लिकार्जुन उमडी यांनी गेल्या दहा वर्षांपासून कामानिमित्त जगभर प्रवास करताना विमानात मिळालेल्या नियतकालिकांचा निगुतीने संग्रह केला आहे.
भाग्यश्री मुळे।
नाशिक : देश-विदेशातील विमान प्रवासात पाणी, खाद्यपदार्थ, ब्लॅँकेट आदींबरोबरच दिल्या जाणाºया नियतकालिकांची दखल कुणी फारशी घेत नाही. बहुतांशी लोक काही क्षण ते चाळतात आणि बाजूला ठेवून देतात. पण मुळातच वाचनाची आणि ज्ञान वाढविण्याची आवड असणारे नाशिकचे उद्योजक मल्लिकार्जुन उमडी यांनी गेल्या दहा वर्षांपासून कामानिमित्त जगभर प्रवास करताना विमानात मिळालेल्या नियतकालिकांचा निगुतीने संग्रह केला आहे. त्याची लिम्का बुकने नोंद घेतली असून, त्यांचा बहुमान केला आहे.
केवळ नियतकालिकांचा संग्रहच नव्हे तर स्वत:च्या वाचनानंतर कुटुंबीयांनीही ते वाचावे असा आग्रह धरणाºया उमडी यांच्या सवयीमुळे या नियतकालिकांची मोठी लायब्ररीच त्यांच्या घरी तयार झाली आहे. आजवर त्यांनी अमेरिका, आॅस्ट्रेलिया, लंडन, जपान, ब्राझिल, आफ्रिका आदी अनेक देशांच्या प्रवासात १७५ नियतकालिके संकलित केली आहेत. त्यांना लहानपणापासून वाचन व प्रवासाची आवड आहे. नवनवीन ठिकाणांना भेटी देत प्रत्यक्ष अनुभव घेणे, ज्ञान वाढविणे हा त्यांचा दुसरा छंद होता. आजही व्यवसाय व इतर कारणांमुळे त्यांना देश-विदेशात मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो. त्यामुळे तासन्तास एकाच ठिकाणी बसून कंटाळवाणा अनुभव न घेता वाचनानंद देण्याचे काम विमानांमधील ही नियतकालिके करत असल्याचे ते सांगतात. उमडी हे नाशिकच्या सातपूर येथील औद्योगिक वसाहतीतील एका डायकास्टिंग फॅक्टरीचे मालक आणि संचालक आहेत. आॅफिसच्या कामानिमित्त २००६ ते २०१६ या दहा वर्षांच्या कालावधीत देश-विदेशात केलेल्या ३३ प्रवासांदरम्यान त्यांनी ही नियतकालिके गोळा केली आहेत.
उमडी यांनी या नियतकालिकांचे विमान प्रवासात मिळालेल्या वेळेत वाचन केल्यानंतर ती नियतकालिके आवडीने घरी नेऊन पुन्हा निवांतपणे त्यांचे वाचन केले आहे. वाचून झाल्यानंतर आपल्या मुलांनाही त्यांनी ती वाचायला दिली असून, त्या नियतकालिकांमधून काय ज्ञान मिळते याची माहिती देत त्यांनाही त्याची गोडी लावली आहे. मुलांनीही वाचून झाल्यानंतर ती नियतकालिके व्यवस्थित पुस्तकांच्या कपाटात ठेवली आहेत. या नियतकालिकांमध्ये त्या त्या देशातील प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक बातम्या, कार, गॅझेट्स अशा असंख्य माहितीचा खजिना आहे. गेल्या दहा वर्षांत प्रवासादरम्यान त्यांनी जमविलेल्या या नियतकालिकांमध्ये काही विमान कंपन्यांकडून मोफत मिळालेले तर काही त्यांनी विमानांमधून खरेदीही केले आहेत.