जिल्हा परिषदेच्या सीईओपदी लीना बनसोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:31 AM2020-02-15T01:31:52+5:302020-02-15T01:32:10+5:30
गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीही रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारीच बनसोड पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
नाशिक : गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीही रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारीच बनसोड पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची भंडारा जिल्हा परिषदेत गेल्या महिन्यातच बदली करण्यात आली होती. नाशिक जिल्हा परिषदेत बदलून आल्यानंतर अवघ्या सात महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आल्याने महिनाभरापासून सदरचे पद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. त्यासाठी दिलीप स्वामी व रवींद्र जगताप यांची नावे चर्चेत होती. परंतु शुक्रवारी शासनाने वाशिमच्या अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीवर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारी त्या पदभार घेण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते.