पुण्याच्या धर्तीवर नाशिकमधील मॉलमध्येही फ्री पार्कीग ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 04:47 PM2019-06-22T16:47:13+5:302019-06-22T16:49:06+5:30
नाशिक- पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्कींग फ्री करण्याचा प्रस्ताव असून महापौर रंजना भानसी देखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
नाशिक- पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्कींग फ्री करण्याचा प्रस्ताव असून महापौर रंजना भानसी देखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरात मॉल्सची संख्या वाढत आहे. परंतु सर्वच ठिकाणी पार्कींगचे शुल्क आकारले जातात. अनेक मॉल्सला महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्कींगसाठी शुल्क आकारून संबंधीत मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉलमध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते आणि नंतर मात्र ती पावती मॉलमधून बाहेर पडताना परत घेतली जाते. त्यामुळे शासनाच्या कर चोरीचा हा प्रकार असल्याची देखील चर्चा आहे. मॉल्स चालक शुल्क घेत असल्याने अनेक नागरीक मॉलच्या बाहेरच वाहने लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत असते.
दरम्यान, महापालिकेच्या नगररचना अधिनियमात व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचा भार त्यांनीच सांभाळला पाहिजे परंतु मॉल्स चालक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने निशुल्क वाहनतळ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे यांनी यासंदर्भात गेल्या गुरूवारी (दि.२०) झालेल्या महासभेत प्रस्ताव मांडला होता. महापालिकेच्या एका जागेच्या पोटनिवडणूकीमुळे आचारसंहिता सुरू असल्याने २५ जून रोजी यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, महापौर रंजना भानसी यांनी नागरी हिताचा निर्णय असल्याने तो अमलात आणला जाईल असे सांगितले.