पेन्शनचे आमीष दाखवून ज्येष्ठ महिलेचे एक लाखाचे दागिणे लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 06:22 PM2019-03-21T18:22:54+5:302019-03-21T18:23:37+5:30
नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले.
नाशिक : ‘मुळ कागदपत्रे आणि दागिणे सोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवत भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे १ लाख ७ हजारांचे दागिणे घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संश्यित भामट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले. तेथे अज्ञात व्यक्तीने घासी यांना एका रिक्षात बसविले. त्यांना विविध शासकिय योजनांची माहिती सांगत विश्वास संपादन करून पेन्शन सुरू करुन देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये आवश्यक असल्याचे सांगूत त्या ज्येष्ठ महिलेजवळील ७५ हजार रुपयांची तीन तोळे वजनाची सोनसाखळी, ७ हजार रुपयांचे कानातील आभुषणे, १२ हजार ५०० रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पोत, तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण १ लाख ७ हजार रुपयांचे दागिणे घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात भामट्याचे वर्णन महिला घाबरली असल्यामुळे सांगू शकलेली नाही. तसेच महिलेने रिक्षाचा क्रमांकदेखील बघितला नसल्याने या भामट्याची ओळख पटविणे अवघड होत आहे; मात्र अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींचा गोपनिय माहितीच्या आधारे शोध सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन चालू करण्याचे आमीष देऊन रक्कम अथवा दागिण्यांची मागणी करणाऱ्यांची माहिती संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यांना द्यावी. कुठल्याहीप्रकारे अमीषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.