बहुचर्चित शेमळी फार्मिंग सोसायटी अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:14 PM2020-06-23T17:14:51+5:302020-06-23T17:15:44+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेली व महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेल्या जुनी शेमळी येथील नवमहाराष्ट्र को. आॅप. जॉइंट फार्मिंग सोसायटी अवसायनात निघाली आहे. बागलाणचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी तसे आदेश दिले आहेत.
सटाणा : बागलाण तालुक्यातील साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेली व महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेल्या जुनी शेमळी येथील नवमहाराष्ट्र को. आॅप. जॉइंट फार्मिंग सोसायटी अवसायनात निघाली आहे. बागलाणचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी तसे आदेश दिले आहेत.
सहायक सहकार अधिकारी एल. एम. गमे यांची अवसायक म्हणून नेमणूक केली आहे. तालुक्यातील ठेंगोडा येथील नाशिक जिल्हा सूतगिरणीनंतर ही नामांकित संस्था अवसायनात गेल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
जुनी शेमळी येथील हेमंत वसंत पाटील यांनी अध्यक्ष सुरेश धर्मा शेलार व संचालक मंडळाविरोधात सहायक निबंधकांकडे तक्र ार दाखल केली होती. कामकाज बंद असल्याची खात्री झाल्याने सहायक निबंधक भडांगे यांनी १७ जूनला हा निर्णय दिला आहे.
पुणे येथील येरवडा कारागृह मुद्रणालयाच्या व्यवस्थापकांना वरील मजकूर महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून सदर राजपत्राच्या चार प्रती या कार्यालयास पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, १७ जुलै रोजी याच्यावर सुनावणी होणार असून, कार्यकारिणीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
असा ठेवला ठपका ....
संस्थेचे आजपर्यंत दप्तर पूर्ण केलेले नाही व लेखापरीक्षणदेखील केलेले नसल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात सहकार अधिकारी एन. व्ही. साळवे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात संस्थेवर अवसायनाची कारवाई केल्याचे नमूद केले आहे. संस्थेच्या चौकशी अहवालात नवीन उपविधी आदर्श उपविधी स्वीकारलेली नाही. वार्षिक सभा, मासिक सभा घेतल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.