धावत्या रेल्वेतील तपासणी मोहिमेत आढळली दारू, सिगरेट, गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 11:41 AM2022-09-25T11:41:51+5:302022-09-25T11:42:03+5:30
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विविध स्थानकांवर स्वच्छता पंधरवडा
मनमाड : स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छ आहार दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध स्थानकांवर तसेच धावत्या रेल्वेमधील पेंन्ट्री कारमध्ये खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्याची दोन दिवसीय मोहीम हाती घेतली आहे. मनमाड स्थानकावरदेखील ही मोहीम राबविण्यात आली असून, भुसावळ स्थानकातील एका खाद्यपेय स्टॉलमध्ये तपासणीदरम्यान चक्क बेकायदेशीरपणे मद्यसाठ्यासह सिगरेट आणि गुटखा मिळाल्याने स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.
भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरले आहे. आरामदायी व स्वस्त प्रवासाकरिता प्रवासी प्रथम प्राधान्य रेल्वेलाच देतात. यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना नेहमीच प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. याचाच फायदा घेऊन रेल्वे स्थानक परिसर आणि धावत्या रेल्वेमध्ये दारू, सिगरेट आणि गुटखा विक्री करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अवैध व्यावसायिकांकडून वाढल्याचे बोलले जात असतानाच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात स्थानक आणि धावत्या ट्रेनमध्ये स्वच्छता पंधरवडा आणि आहार दिनानिमित्त वाणिज्य निरीक्षक, केटरिंग निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी दोन दिवसीय तपासणी मोहीम हाती घेतली.
या मोहिमेत भुसावळ स्थानकातील फलाट क्रमांक १ व २ वर असलेल्या दीपाली चौधरी यांच्या स्टॉलमध्ये तपासणी दरम्यान विदेशी दारूच्या ८ बाटल्या, देशी दारूच्या १० बाटल्या, ६ पाकिटे गुटखा, सिगरेट व विडी पाकिटे आढळून आली. यामुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी रेल्वे पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.
भुसावळ विभागाचे वाणिज्य प्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे, कमर्शियल इन्स्पेक्टर नितीन राठोड, कमर्शियल डीआय स्टेशन मॅनेजर मिलिंद साळुंखे, तिकीट निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. रेल्वे स्थानक परिसरात आणि धावत्या रेल्वेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तंबाखू, सिगारेट, मद्य आणि ज्वलनशील पदार्थांसाठी बंदी आहे. मात्र, रेल्वे स्थानकावरील कॅन्टीनमध्येच हा सर्व साठा सापडल्याने प्रवासी वर्गात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सर्व स्थानकांची अशी अधूनमधून तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांत तर सर्रासपणे गुटखा, तंबाखू, सिगारेट विकली जात असल्याचे आढळून येते तरी त्या विक्रेत्यांना संबंधित प्रशासनाकडून अडविले जात नसल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळते, अशी चर्चा प्रवाशांमध्ये आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे असल्याची प्रवाशांची मागणी आहे.
भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा आणि बडनेरा रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये दोन दिवसीय स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छ आहार दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये वाणिज्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २० पथके तयार करण्यात आली असून, स्थानके आणि धावत्या रेल्वेमध्ये तपासणी केली.
भुसावळ विभागातील प्रवासी रेल्वे गाड्या आणि स्थानकांतील खाद्य-पेय पदार्थ विकणाऱ्या स्टॉलची दोन दिवसीय तपासणी मोहीम हाती घेतली असून, यापुढेदेखील ही तपासणी मोहीम सुरूच राहील - डॉ. शिवराज मानसपुरे, वाणिज्य, प्रबंधक भुसावळ.